शहादा । ता.प्र.- shahada

जिल्ह्यात परराज्यातून येणार्या वाळूवर वॉच ठेवण्यासाठी शासनाने नुकतेच परिपत्रक काढून कार्यपद्धती निश्चित केली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी परिपत्रकातील अटी व शर्तींचे पालन करण्यासाठी महसूल, पोलिस व परिवहन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी परराज्यातून वाळू भरून येणारे सात वाहने जप्त केली आहेत. पहिलीच मोठी कारवाई झाल्याने वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

परराज्यातून आणलेल्या वाळूच्या साठा व निर्गतीच्या कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाने 5 फेब्रुवारीला परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परराज्यातून वाळू व रेती वाहतूक करणार्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परराज्यातील वैध मार्गाने येणार्या वाळूची अनुज्ञप्ती क्षेत्रीय कार्यालयाने तपासून त्या राज्यातून आलेली वाळू वैध परवानाद्वारे आल्याची खात्री करावी.

संबंधित व्यक्ती किंवा संस्था स्वतःच्या वापरासाठी परराज्यातून आणलेला वाळू साठा न करता सरळ बांधकामाच्या ठिकाणी नेणार असल्यास सदर व्यक्ती किंवा संस्थेकडे त्या राज्यातील अवैध वाहतूक पास परिमाण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यक्ती किंवा संस्था वाळूचा साठा विक्री करणार असल्यास राज्य गौण खनिज उत्खनन नियमानुसार परवाना घेणे आवश्यक आहे. दरम्यान, परिपत्रक आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी तात्काळ पोलीस महसूल व परिवहन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले तपासणी पथक नेमण्यात यावे तसेच तात्काळ चेक नाके उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

सात वाहने पकडली

दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी निर्देश दिल्यानंतर येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांनी गुजरात राज्यातून येणार्या सात वाळू वाहतुकीचे ट्रक त्यात आयवा सारख्या मोठ्या गाड्यांचाही समावेश आहे. (एम. एच 18- ए.झेड.0909), (एम. एच.18-बीए.5277), (एम.एच.18 ए.ए.7983), (एम.एच.15 सी.के - 340) (एम.एच.12- एन.एक्स.-2995) (एम. एच.39 सी.1585) एका वाहनाच्या नंबर समजू शकला नाही असे एकूण सात वाळूने भरलेले ट्रक जात असताना श्री.बुधवंत यांनी विचारपूस करत पोलीस ठाण्यात जमा केले आहे. सदर वाहनांची अद्याप चौकशी बाकी असून उद्या चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. परंतु या कारवाईमुळे वाळू वाहतूकदार चांगलेच धास्तावले आहे.

शहादा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत असून त्यासाठी प्रशासनाने चेक नाके उभारून कारवाई केल्यास शासनाच्या महसुलातही वाढ होईल. शिवाय अवैध वाळू वाहतूक निश्चितच लगाम बसेल.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान मध्ये दहा टक्के रक्कम

परराज्यातून रस्त्याने अथवा जलमार्गाने आणलेली वाळू महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या जिल्ह्यात संबंधिताने राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वामित्वधन दराच्या दहा टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक आहे. संबंधित रकमेचा भरणा केल्यानंतर झिरो रॉयल्टी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय कार्यवाही करेल.

परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवानापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झिरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.