मूर्तिकार करोना आपत्तीत संकटात
जळगाव

मूर्तिकार करोना आपत्तीत संकटात

सणांवर महामारीचे सावट

Rajendra Patil

लक्ष्मण सुर्यवंशी

पाचोरा - Pachora

करोना महामारीच्या आजाराने मानवी जीवन व उद्योग-व्यवसाय विस्कळीत आणि प्रभावित झाले आहे. श्रीमंत, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, मजूर, कड्यांच्या टोपल्या, केरसुणी विकणारे, विविध व्यवसाय करणारे कारागीर असे सर्व घटक आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यावसाय डबघाईला जात असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

करोनारुपी आजाराने गती-प्रगती व मतीला खीळ घातली आहे. त्यातच परंपरागत साजरे होणारे सर्व सामाजिक सण-उत्सव-यात्रा यांच्यावर बंदी असल्याने या कालावधीत होणारी आर्थिक उलाढाल थंडावल्याने सणांच्या काळात विविध साहित्य समुग्रीची खरेदी विक्री करणारे दुकानदार, मूर्तिकार, कारागीर आणि यावर अवलंबून असणारे सर्व व्यावसाय संकटात सापडले आहेत.

धार्मिक सण-उत्सव कोरोनाच्या सावटात

भारतातील विविध प्रांतात धार्मिक सण-उत्सव यात्रा साजरी करण्याची अनादी काळापासून प्रथा व परंपरा राहिली आहे. हे सण साजरे होत असतांना याच्याशी संलग्न व्यावसायातून करोडो- लाखों रूपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सर्व सामाजिक सण साजरे करण्यास बंदी झाल्याने सणांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीला खिळ बसली आहे. देव मंदिरात तर मानव घरात बंदीस्त अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून धार्मिक सण कोरोनाच्या सावटात सापडले आहेत.

पोळा- गणपती व नवरात्र उत्सवावर विरजण

श्रावण महिन्या पासून हिंदुस्थानात विविध धार्मिक सण एकापाठोपाठ पोळ्या नंतर साजरे होतात. पोळा आला की कुंभार मातीचे बैल बनविण्याच्या तयारीला लागतात. भाद्रपदात देशातील कानाकोपऱ्यातील गणेशभक्त गणपती उत्सवासाठी सज्ज होतात. त्या नंतर अश्विन महिन्यातील शक्तीचं रूप नवरात्र दुर्गाउत्सव जप, तप, उपवास करून साजरा करण्यासाठी घरोघरी माता-भगिनी व मंडळे तयारीला लागतात. या तिन्ही अत्यन्त महत्वाच्या सणांच्या दरम्यान पोळ्यात शेतकरी सर्जा बैलांसाठी साज व अन्य शेतीपयोगी साहित्य खरेदी करतात.

गणेशोत्सवात बालगोपाल पासून ते मोठे-लहान गणेश मंडळे विविध प्रकारच्या सजावटीचे डेकोरेशनसाठी लागणारे लाकडी, कापडी, प्लॅस्टिक नवनवीन विजेचे व अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्यांची गणपतीत व नवरात्रीच्या काळात खरेदी विक्री होते. देवीच्या सजावटीच्या शृंगारिक वस्तू, साड्या, ओढण्या,सोने, चांदी, बेंटेक्सचे दागिने, गर्भारास खेळतांना तरुणी-तरुण परंपरागत कपडे खरेदी करतात.

गृहिणी सौंदर्याचं लेणं, साड्या अलंकार,बांगड्या व काळानुसार आकर्षक वस्तू, पूजेचे साहित्य, परंपरेने लागणारे वेगवेगळ्या धातूंचे किंवा मातीचे घट, काड्यांच्या टोपल्या, केरसुणी, सुगंधित धूप वस्तू, अगरबत्ती दिवे, कवड्याच्या व फुल प्लॅस्टिक माळा, लायटिंग, अशी नानाविध साहित्यांची या सणांच्या दरम्यान खरेदी -विक्रीतून देशभरात कोटी व लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे लोकांच्या हातात व बाजारपेठेत पैसा फिरतो परंतु यंदा कोरोना आजारामुळे धार्मिक सणांवर कायद्याचे बंधन आहे.

परंपरागत व्यावसायातून मूर्तिकारांचे व कारागिर कलाकारांच्या कुटुंबाचे वर्षातील आर्थिक नियोजन होत असते. परंतु सद्यस्थितीला निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत गणेश मूर्त्यांची जास्त मागणी नसल्याने कारागिरांना काम देणे परवडत नसल्याने या कलाकारांचे हात रिकामे दिसतात.मूर्ती कारखान्यात उदासीनता तर मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर उदासीनता पहायला मिळाली. या आपत्तीत मूर्ती विक्री व्यावसाय संकटात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com