जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची कमी होत असलेली संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पारित केले आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा, महाविद्यालयात उपस्थित रहावे. अभ्यासिका व वाचनालय यांना केवळ 50% क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील असे निर्देशात म्हटले आहे.

लग्न समारंभास केवळ 50 जणांना उपस्थितीची परवानगी

लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आहे.

सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचार्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी , सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर बंधनकारक राहील. संपूर्ण जळगांव जिल्हयात रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कर्फ्यू घोषित करण्यात येत आहे. या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन, शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतील घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

ऑटोरिक्षामधून दोन प्रवाशांची वाहतूक

बाहेर गावाहून येणार्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना सवलत आहे. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील. निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील.

मात्र केवळ 5 लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.

नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेश

कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकार्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए. के पाठक, महानगर पालिकेच्या अप्पर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.