जळगाव कृऊबास व्यापारी संकुल बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा

जळगाव कृऊबास व्यापारी संकुल बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा

संचालक मंडळासह विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी संकुलाच्या बांधकामात शासनाकडून मिळालेल्या परवानगीपेक्षा तिप्पट बांधकाम करण्यात आले आहे.184 दुकाने बांधण्याची परवानगी असतांना, 200 दुकानांचे याठिकाणच्या व्यापारी संकुलात बांधकाम करण्यात आले असून बांधकामात कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे.

या गैरव्यवहारात सहभागी सर्वांची चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आज मंगळवारी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील दिक्षीतवाडी येथे पत्रकार परिषदेव्दारे केली. यात गैरव्यवहारात प्रकाश जाखेटे, श्रीकांत खटोड, संदीप भोरटक्के यांच्यासह आजी माजी संचालक मंडळ यांचा तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग असल्याचा आरोपही यावेळी अ‍ॅड. पाटील यांनी केला आहे.

कृषी बाजार समितीच्या आवारात 184 गाळे बीओटी तत्वावर विकसीत करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावानुसार शासनाने 5 सप्टेंबर 2014 रोजी परवानगी दिली. त्यानुसार निविदा काढण्यात येवून संबंधित बांधकामाचा ठेका हा पराग कन्स्ट्रक्शन यांना मिळाला. त्यांनी शासनाच्या परवानगीनुसार 1352.10 चौरस मीटर एवढे निर्धारीत करुन दिलेल्या क्षेत्रानुसार बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता 3928.51 चौरस मीटर एवढे वाढीव बांधकाम केले. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी संकुलाचे बांधकाम करतांना शासनाच्या परवानगीपेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढीव बांधकाम करण्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला आहे.

भाजपची सत्ता असतांना परवानगी

कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलाच्या जागेचे बांधकाम करत असतांना याठिकाणी महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने संबंधित व्यापारी संकुलाच्या बांधकाम परवानगी मिळत नव्हती. अखेर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर संबंधितांच्या कार्यकाळात याठिकाणी बांधकामास महापालिकेकडून परवानगी मिळाली. यात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला आहे.

गैरव्यवहाराबाबत सहकारमंत्र्यांकडे तक्रार

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबती माहिती अ‍ॅड. विजय पाटील माहिती अधिकार कायद्यातंर्गत मिळविली. तसेच त्याबाबत कागदपत्रांनुसार बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या बांधकामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असून संबंधित गैरव्यवहाराची शासन स्तरावरुन उच्च पदस्थ अधिकार्‍यांची समिती नियुक्ती करावी व चौकशी करावी, शासनाने बांधकामास दिलेली मान्यता रद्द करावी, गाळे बांधकामाबाबतची संपूर्ण प्रक्रिया, आजपावेतो झालेले ठराव व करारनामे, रद्द करावेत, संचालक मंडळ यांनी विकासकाच्या बाजूने केलेले बेकायदेशीर ठराव व विकासकाचे आर्थिक हित जोपासून कोट्यवधींचे आर्थिक नुकसान केले असल्याने संचालक मंडळ बरखास्त करावे, विकासक, त्यांचे भागीदार, संचालक मंडळ यांच्याविरुध्द शासनाची फसवणूक केली म्हणून व कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले म्हणून त्यांच्याविरोधात शासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी मागणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी 9 मार्च 2021 रोजी सहकारमंत्र्यांकडे केली होती. या प्रकरणात चौकशीकामी वेळावेळी म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मिळावी असेही म्हटले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com