जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हयात 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होउन तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण गत सप्ताहात दि.28 जानेवारी रोजी जाहिर करण्यात आले.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून येत्या एक दोन दिवसांत सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर होउन आगामी आठवडाभरातच सरपंच पदाची निवड होणार आहे.

त्यामुळे निवडून आलेल्या बहुतांश सदस्यांनी लक्ष्मीदर्शन होउन गुलाबी थंडीचा आस्वाद घेत सहलीवर रवाना देखील झाले असल्याचे चर्चिले जात आहे.

देशात लोकशाहिच्या माध्यमातून वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणूकां सुरू असतात. राज्यात गेल्या दहा अकरा महिन्यांपासून कोरोना प्रादूर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या सर्वच निवडणूकांची भाउगर्दी सुरू झाली असून मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत.

मात्र यंदा सरपंच पदाची निवडणूक मात्र लोकनियुक्त पद्धतीने न होता सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात निवडून आलेल्यांमधून सरपंच निवडीसाठी सदस्यांना लक्ष्मीदर्शन होण्याची शक्यता आहे.

तर काहीं सदस्य सहलीवर रवाना देखिल झाले आहेत. जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतीपैकी 92 ग्रा.प.निवडणूक बिनविरोध होउन सदस्य निवडून आले.

गेले लग्नाला... हजेरी मात्र सहलीला

जिल्ह्यात बर्याच ठिकाणी सत्तारूढ महाविकास आघाडीचे सदस्य काठावर तर बहुतांश ठिकाणी विरोधी पक्षात असलेल्या भाजपासह अन्य अपक्षांचे गट निवडून आले आहेत.

अनेक ग्रामपंचायत पातळीवर सदस्यांना गटबदल करण्याविषयी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे सरपंच पदाची निवडीचा कार्यक्रम जाहिर होताच अनेक ठिकाणी ऐनवेळी सरपंचपदाची गणिते बिघडणार आहेत.

त्यामुळे अनेक गटप्रमुखांनी धोका पत्करावा लागू नये म्हणून सर्वच सदस्यांना लक्ष्मीदर्शन घडवून सहलीवर रवाना देखिल केले आहे.

गावात निवडून आलेले सदस्य लग्नानिमित्त बाहेर गावी गेले आहेत वा नातेवाईकांकडे गेले आहेत असेच चित्र रंगविले जात आहे.