पालनजीक दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

पालनजीक दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

रावेर|प्रतिनिधी

दोन मोटार सायकलीवरून पालकडे जाणाऱ्या दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल होऊन,घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. सदरील मोटार सायकलस्वार शिकार किंवा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पालकडे जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि तसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील पोलिस ठाण्याची पोलीस व्हॅन (क्र एमएच १९- एम- ०६८१) नेहमी प्रमाणे रात्री पाल येथे गस्त घालण्यासाठी गेली होती. गाडीत पोलीसकर्मचारी श्रीराम कांगणे आणि गृहरक्षक दलाचे सुनिल तडवी,कांतीलाल तायडे आणि अमित समर्थ होते. परत येताना पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी सहस्त्रलिंग गावानजीकच्या सलीम तडवी यांच्या ढाब्याजवळ हे चौघे चहा पिण्यासाठी थांबले असता, रावेरकडून त्यांना दोन मोटारसायकली येताना दिसल्या. इतक्या मध्यरात्री कोण आहे हे पाहण्यासाठी पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला मात्र पहिली मोटरसायकल वेगात पालकडे निघून गेली. मात्र दुसऱ्या मोटारसायकल स्वाराने पोलिसांना पाहताच मोटर सायकल थांबवली, मागील व्यक्तीने पोलिसांच्या आणि गाडीच्या दिशेने गोळीबार केला आणि तातडीने आल्या रस्त्याने मोटारसायकल निघून गेली.

चौघांनी त्यांचा पाठलाग केला असता,दरोडेखोर यांची मोटार सायकल स्लिप झाल्याने,घटनास्थळी त्यांच्या हातून बंदूक निसटून पडली, पण अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन ते पसार झाले.या याबाबत रावेर पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

घटनेची खबर रावेर पोलीस ठाण्यात मिळतात तपासकामी पोलीस पथक परिसरात रवाना करण्यात आले. घटनास्थळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com