दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन

शेतकर्‍यांना दिलासा :15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पिकांना नवसंजीवनी
दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या पंधरवड्यापासून बेपत्ता झालेला पावसाने जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून हजेरी लावल्याने करपत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत आहे.

जिल्ह्यातील काही तालुक्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली होती. त्यातील काही जमीनीतून अंकुर वर येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी पेरण्याही खोळंबल्या होत्या. काही तालुक्यात अधून मधून तुरळक पाऊस झाला. त्यात उर्वरित पेरण्या आटोपल्यावर गेल्या पंधरवड्यापासून पाण्याचा थांग पत्ता नव्हता. तर उन्हाच्या चटक्याने सोयाबीन सारखे पिकं पिवळट होऊ लागले होते. मात्र, शुक्रवारी जळगाव तालुक्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आणि नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पावसामुळे बळीराजा सुखावला

जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला असून पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला काही भागात पडलेला तुरळक पाऊस वगळता बरेच दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

5 लाख 50 हजार हेक्टरवर पेरण्या

जून महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार सुरुवातीला जिल्ह्यात सर्वदूर पाऊसही झाला. परिणामी शेतकर्‍यांनी पेरणीची लगबग सुरू केली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे काही भागात पेरण्या रखडलेल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्यांना आता दुबार पेरणीची भीती वाटत होती. पाऊस लांबल्यास त्याचा विपरीत परिणाम विविध पिकांवर विशेषतः कापसाच्या लागवडीवर होण्याचा धोका होता.

जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के पेरणी पूर्ण झालेल्या आहेत. जिल्ह्यात यंदा 7 लाख 66 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन होते. त्यापैकी 5 लाख 50 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com