नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्याचा ठराव

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्याचा ठराव

कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जिल्हा परिषदेकडून ठराव मंजुरीसाठी शासनाकडे जाणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये करण्याचा ठराव जिल्हा परिषद प्रशासनाने पटलावर ठेवला होता.

त्या ठरावाला जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सूचक म्हणून मंजुरी देवून पं.स.गण आणि जिल्हा परिषदेचा गट कायम ठेवून जिल्हा परिषदेने कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना मांडली होती. त्यादृष्टीने जि.प.प्रशासन हा ठराव शासनाकडे पाठविणार आहे, असा निर्णय मंगळवारी ऑनलाइन झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

नशिराबाद ग्रामपंचायतीसाठी डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. जानेवारी महिन्यात मतदान प्रक्रिया असल्याने काहींनी 28 डिसेंबर रोजी फॉर्म भरुन निवडणुकीचा ज्वर वाढला होता.

त्याच दरम्यान नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये करण्याचा आदेश पारित झाल्याने काही इच्छुक उमेदवारांनी 3 जानेवारी रोजी दाखल अर्ज माघारी घेतले. मात्र, एकाने अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक प्रक्रियाविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

आता नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये करण्याची प्रक्रिया शासनपातळीवर सुरु झाली असून प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. 10 मे रोजी स्थायी समितीमध्ये नगरपरिषदेमध्ये रुपांतरीत करण्याचा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

त्या ठरावाला जि.प.सदस्य मधुकर काटे हे सूचक झाले असून जि.प.स्थायी समितीने या ठरावाला मान्यता दिली आहे. आता जिल्हा परिषदेकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन हा ठराव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दोन ते तीन महिन्यानंतर नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यानंतर या पंचायत समितीचा गण आणि जिल्हा परिषदेचा गट कोणत्या गावांना वगण्यात येईल आणि कोणत्या गावांना जोडले जाईल,याविषयी कागदपत्रांची पूर्तता शासन दरबारी सादर करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आठ महिन्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण

सध्या नशिराबाद-भादली गटाचे जि.प.सदस्य तथा उपाध्यक्ष लालचंद पाटील हे निवडून आलेलेे आहेत. सात ते आठ महिन्याच्या कालावधीनंतर जि.प. सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. तोपर्यंत नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झालेले असेल. पं.स. आणि जिल्हा परिषद गट कायम राहावा, अशी अपेक्षा जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com