रावेर : ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने रुग्ण हलवण्याची वेळ

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हलवण्याची प्रक्रिया थांबवली : तालुका प्रशासनाने पाठपुरावा करून मिळवले १० ऑक्सिजन सिलेंडर
रावेर : ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने रुग्ण हलवण्याची वेळ
करोना प्रतिबंध पहिली लस घेतांना न्या.आर.एल.राठोड

रावेर - Raver - प्रतिनिधी :

येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा संपल्यागत असल्याने,दाखल रुग्णांना इतरत्र हलवण्याची तयारी सुरू असतांना, खा.रक्षा खडसे व आ.राजुमामा भोळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विचारणा करून,रुग्णांना इतरत्र हलवू नये अशी विनंती केल्याने,तूर्तास रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात थांबवचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहे.

येथे ३२ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.या रुग्णांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा शुक्रवारी संपण्याच्या उंबरठ्यावर असल्याने,तातडीने त्यांना जळगांव वैदकीय महाविद्यालय व डॉ उल्हास पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू असताना,याबाबत नेहता सरपंच महेंद्र पाटील व काही रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट खा.रक्षा खडसे व भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.राजुमामा भोळे यांना याबाबत सांगितले .

त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना याबाबत कळवल्याने, जिल्हाधिकारी यांनी रुग्णांना हलवण्यात येऊ नये अशी सूचना नोडल ऑफिसर डॉ. एन.डी.महाजन व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना करून भुसावळ येथून सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

यामुळे ग्रामीण रुग्णालयातील २२ रुग्णांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.मात्र तरीही ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त करण्यासाठी यंत्रणेची दमछाक सुरु असून,दुपारी भुसावळहून १० सिलेंडर प्राप्त झाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

रावेरच्या रुग्णांसाठी खा.रक्षा खडसे व जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे आले धावून

रावेर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन नसल्याने इतरत्र हलवण्यात येत असल्याची माहिती खा.रक्षा खडसे व आ.राजूमामा भोळे यांना मिळाल्यावर त्यांनी याबाबत चक्रे फिरवून जिल्हाधिकारी यांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलवण्यापासून रोखले आहे.तहसीलदार व नोडल ऑफिसर यांनी अनेक ठिकाणी संपर्क साधून १० सिलेंडर मिळवले आहे.मात्र तरीही अजून संकटाचे सावट पूर्णपणे सारलेले नसल्याने,रुग्णांच्या नातेवाईकामध्ये भीती कायम आहे.

न्या.आर एल राठोड यांनी घेतली लस

येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी न्या.आर.एल.राठोड यांनी शुक्रवारी रावेर ग्रामीण रुग्णालयात लस घेतली.यावेळी ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com