शिकाऱ्यांचा पोलिसांवर गोळीबार

शिकाऱ्यांचा पोलिसांवर गोळीबार

पालजवळील थरारक घटना

रावेर - Raver - प्रतिनिधी :

दोन मोटार सायकलीवरून पालकडे जाणार्‍या दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल होऊन, घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे.

दरम्यान पसार झालेले मोटार सायकलस्वार शिकार करण्याच्या उद्देशाने पालकडे जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दि.12, मंगळवारी सकाळी 3 वाजून 10 मिनीटांनी पहाटे पालनजीक ही घटना घडली.घटनास्थळी श्वानपथक आणि तसे तज्ञांना पाचारण झाले होते.

याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील पोलिस ठाण्याची पोलीस कॅमेरा व्हॅन (क्र एमएच 19- एम- 0681) नेहमी प्रमाणे रात्री पाल येथे गस्त घालण्यासाठी गेली होती. गाडीत पोलीस कर्मचारी श्रीराम कांगणे आणि गृहरक्षक दलाचे सुनिल तडवी, कांतीलाल तायडे, अमित समर्थ होते. परत येताना पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी सहस्त्रलिंग गावानजीकच्या सलीम तडवी यांच्या ढाब्याजवळ हे चौघे चहा पिण्यासाठी थांबले असता, रावेरकडून त्यांना दोन मोटारसायकली येताना दिसल्या.

इतक्या मध्यरात्री कोण आहे हे पाहण्यासाठी पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला, मात्र पहिली मोटरसायकल वेगात पालकडे निघून गेली. मात्र दुसर्‍या मोटारसायकलस्वाराने पोलिसांना पाहताच मोटर सायकल थांबवुन आलेल्या दिशेने रावेरकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मागील व्यक्तीने पोलिसांच्या आणि गाडीच्या दिशेने गोळीबार केला. यात मोटार सायकल स्लिप होऊन, त्यांच्या हातातील गावठी बनावटीची बंदूक तुटून रस्त्यावर पडली, ती सोडून दोघी पसार झाले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, दरोडेखोर अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. यायाबाबत रावेर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेटी दिल्या असून संशयितांच्या तपासासाठी पाल परिसरात पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेटी देऊन पाहणी केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख यावेळी उपस्थित होते.

दरोडा नाही शिकार करण्यासाठी आल्याचा पोलिसांना संशय

पाल परिसरात रात्री वन विभागाचे कर्मचारी गस्ती घालतात,यावेळी शिकारी आणि जंगल तोड करणार्‍या लोकांमध्ये अनेक वेळा चकमक झाल्याची घटना घडली आहे.

या आरोपींना देखील पोलिसांची कॅमेरा व्हॅन वनविभागाच्या वाहनासारखी दिसल्याने,गावठी बनावटीच्या सिंगल बारबंदुकीत दारू गोळा ठासून गोळीबार केला असल्याचे सहा.पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांचे म्हणणे आहे.

घटना स्थळावरून एक मोटर सायकल पालच्या दिशेने, तर दुसरी रावेरकडे वळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे, तर पालकडे गेलेल्या मोटार सायकल स्वराच्या उजव्या पायातील चप्पल मिळून आली आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com