रक्षा खडसे माझ्या आवडत्या खासदार

रक्षा खडसे माझ्या आवडत्या खासदार

राजकीय विचारधारा व पक्ष वेगवेगळे असले तरी संसदेतल्या खासदारांपैकी रावेरच्या खासदार रक्षा खडसे या माझ्या सर्वात आवडत्या खासदार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रीया सुळे यांनी केले.

अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात उडान:संजीवनी- नव उद्योजकांसाठी या विशेष उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी सरस्वती लेवा बोर्डिंग सभागृहात विद्यार्थीनीना बीज भांडवलाचे वितरण खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, संस्थेचे सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक आर.डी.वायकोळे, अरुणा पाटील, किरण बेंडाळे, रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावना प्राचार्य एस. एस. राणे यांनी केली.यावेळी नंदन परदेशी यांनी पालकांच्या वतीने तर तृप्ती पाटील, पायल महाजन या लाभार्थी विद्यार्थिनींनी मनोगतातून महाविद्यालयाचे आभार मानले. यानंतर 13 विद्यार्थीनीना बीज भांडवलरुपी वस्तू वितरण खा.सुप्रिया सुळे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

सरकारचे मायबाप तुम्हीच

खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगतात, विद्यार्थिनींच्या कौशल्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, फॅशन डिझायनिंग व ब्युटी थेरपी अभ्यासक्रमातून महिलांना रोजगार मिळत आहे, ही कौतुकाची बाब आहे. जळगावच्या मातीत वैविध्यता असून मला येथील संस्कृतीचा सन्मान वाटतो. मी स्वत:ला नेहमी अपडेट करीत असते.

वाचन आणि तंत्रज्ञान याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. महाराष्ट्र छेडछाडमुक्त करण्याची गरज असून लैंगिक समानता दिसून येत असल्याचे सांगितले. या सरकारचे तुम्ही मायबाप आहात, पुढील पाच वर्षात चांगले शिक्षण, महिला सुरक्षा यासाठी काम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com