जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हयात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोपडा, रावेर, पारोळासह आदी तालुक्यात बेमोसमी पावसाने तुरळक तर काही ठिकाणी जोरदार वादळासह हजेरी लावली होती.

या पावसामुळे जवळपास 3 हजार 593 क्षेत्रावरील रब्बी पीकाचे नुकसान झाले आहे. यात ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, तीळ, हरबरासह अन्य उत्पादनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषी विभाग आणि तहसिल प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पंचनामे करण्यात येत आहे.

जिल्हयात दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. तर जिल्ह्यात तुरळक मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असल्याचेा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला होता. अजून एक दोन दिवस जिल्हयात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे. शुक्रवार रात्र अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे जवळपास 30 ते 40 टक्क्यांच्यावर नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

भुसावळ तालुक्यात पिंपळगाव खुर्द येथेे रामा अशोक कोळी यांच्या घराची भिंत कोसळून दोन बकर्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तलाठी यांनी दिली असून अन्य जिवीत वा वित्त हानी बेमोसमी पावसात झालेली नाही. तसेच स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी नुकसानीबाबत जिल्हा कृषि विभागाशी संपर्क साधला असून या नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासन आणि कृषि विभागाने म्हटले आहे.

33 टक्क्यांवर नुकसान

गुरुवारी झालेल्या वादळीवार्यासह अवकाळी पावसामुळे रावेर तालुक्यातील सात गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील 10, भडगाव 12, चोपडा 19, एरंडोल 22, अमळनेर 58, पारोळा 22 अशा एकूण 150 गावातील 13 हजार 418 शेतकर्यांच्या 3 हजार 593 हेक्टर क्षेत्रावरील अर्थात 33 टक्क्यांवर रब्बीचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली.