संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जळगाव

२५ लाख ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शेतकर्‍यांचा तब्बल 25 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम (सीसीआय) व खासगी बाजार समितीतर्फे कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार कापूस विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी 40 हजार 839 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात कापूस खरेदी सीसीआय यांच्यामार्फत 11 तालुक्यात एकूण 14 जिनिंग-प्रेसिंग मध्ये तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत चार तालुक्यात 14 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कोरोना विषाणू विषयक राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शेतकर्‍यांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस 5110 ते पाच हजार 355 या भावाने खरेदी करण्याचे काम सुरू आहे. 24 जुलै 2020 अखेर जिल्ह्यातील 25 हजार 90 शेतकर्‍यांचा सात लाख 85 हजार नऊशे आठ क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. यापैकी 9920 शेतकर्‍यांचा एक लाख 36 हजार 230 क्विंटल कापूस कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर खरेदी केलेला आहे.

पणन महासंघातर्फे 27 हजार 682 शेतकर्‍यांचा नऊ लाख 66 हजार 301 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. त्यापैकी सात हजार 667 शेतकर्‍यांचा दोन लाख 73 हजार 171 क्विंटल कापूस हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे, तर खासगी बाजार समिती मार्फत 24 जुलैअखेर 8586 शेतकर्‍यांचा दोन लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 701 शेतकर्‍यांचा 21 हजार 449 क्विंटल कापूस कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे 40 हजार 839 शेतकर्‍यांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी 17 हजार 527 शेतकर्‍यांचा कापूस 24 जुलैअखेर पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस खरेदी झाला पाहिजे यासाठी पालकमंत्री पाटील हे आग्रही राहिले असून तशा सुचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार नाव-नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी कापूस विक्रीसाठी बाजार समितींना निर्देश दिले.

Deshdoot
www.deshdoot.com