Crime
Crime
जळगाव

चाळीसगावातील लाचप्रकरणी पोलिसासह एकास सक्तमजुरीची शिक्षा

Balvant Gaikwad

जळगाव - चाळीसगावात खासगी वाहनामधून प्रवासी वाहतुकीच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस नाईकासह एका खासगी व्यक्ती (पंटर) ला न्यायालयाने चार वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड सुनावला आहे.तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे हे चाळीसगावात कॅप्टन कॉर्नर येथून मारुती ओमनी वाहनात प्रवासी भरत होते.

या वेळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय ४४) तेथे आले. चाळीसगाव येथून प्रवासी वाहतूक करायची असेल, तर मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकूण ८०० रुपये लाचेची मागणी पोलीस नाईक पाटील यांनी तक्रारदाराकडे केली. रक्कम दिली नाही, तर तुला प्रवासी वाहतूक करू देणार नाही व वाहनावर कारवाई करणार, असा इशारा दिला.याबाबत जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ मार्च २०१६ रोजी तक्रार दाखल झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी करुन सापळा रचला.

पोलीस नाईक पाटील याने ८०० रुपयांची लाचेची मागणी ३१ मार्च २०१६ रोजी केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी मोहन भिका गुजर (वय ५४) याच्यामार्फत १ एप्रिल २०१६ रोजी साईदत्त हॉटेल येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.चार साक्षीदार तपासलेयाबाबत आरोपींविरुद्ध जळगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

त्यानंतर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील भारती खडसे यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. यात तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे, पंच भाऊसाहेब बागुल, सक्षम अधिकारी, तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या कामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.

अशी आहे शिक्षायाप्रकरणी पोलीस नाईक आबासाहेब पाटील, मोहन भिका गुजर यांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शिक्षा सुनावली. लाच मागितल्याप्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व लाच स्वीकारल्याप्रकरणी चार वर्ष सक्त मजुरी, तसेच दोन्ही कामात प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपी मोहन गुजर याला कलम १२ अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com