जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पाच जणांचे पथक जळगावात तळ ठोकून आहे. सोमवारी या पथकाकडून पुन्हा ठेवीदारासह मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा भरणार्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

दरम्यान उद्या 11 जानेवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयितांच्या जामीनावरही पुणे येथील न्यायालयात कामकाज आहे. यात संशयित सुजीत वाणी यांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला असून निकालावर सुनावणी होणार आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी अशा पाच जणांचे पथक जाब - जबाब नोंदविण्यासह गुन्ह्याच्या तपासात शुक्रवारपासून जळगावात दाखल झाले आहे. या पथकाने शनिवारी झंवर यांच्या कार्यालयातील चार व इतर 2 जण अशा 6 जणांचे जबाब नोंदविले आहेत.

आज रविवार असल्याने पथकाकडून कुठल्याही प्रकारचे जबाब नोंदविण्यासह इतर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे वृत्त आहे. मात्र पथक जळगावातच ठाण मांडून असल्याने मालमत्ता खरेदी करणारे, निविदा भरणारे तसेच कर्जदारांना धडकी भरली आहे.

संशयितांच्या जामीनावर आज कामकाज

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयितांपैकी सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर मंगळवार, 5 जानेवारी रोजी कामकाज झाले. त्याचा गुन्ह्यात महत्वाचा सहभाग असल्याबाबत पुरावेही अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर सादर केले.

दोन्ही पक्षाने युक्तीवाद केला असून जामीनावरील निकालासाठी 11 जानेवारी ही तारीख दिली होती. त्यानुसार त्यांच्या जामीनावर निकालाचे कामकाज होणार आहेत, तसेच इतर संशयित महावीर जैन, विवेक ठाकरे यांनीही जामीनासाठी अर्ज केले असून त्यांच्याही जामीनावर कामकाज होणार आहे. तसेच काही संशयितांनी हायकोर्टात धाव घेतली असून त्यावर मंगळवारी कामकाज होणार असल्याचे वृत्त आहे.