हुश्श..पोलीस विभागातील 310 कर्मचार्‍यांना पदोन्नती

हुश्श..पोलीस विभागातील 310 कर्मचार्‍यांना पदोन्नती

अनेकांना दिलासा : पोलीस अधीक्षकांचे आदेश

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा पोलीस दलात डॉ. प्रवीण मुंढे यांनी पहिल्यांदाच तब्बल 300 हून अधिक कर्मचार्‍यांना एकाचवेळी पदोन्नतीचे आदेश 16 एप्रिल रोजी पारित केले होेते.

मात्र पदोन्नतीला शासनाने स्थगिती दिली होती. शासनाने स्थगिती उठविल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हाभरातील पात्र 310 कर्मचार्‍यांना अखेर पदोन्नती मिळाली असून दिलासा मिळाला आहे. पदोन्नत्तीबाबतचे सुधारीत आदेश डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पारित केले आहेत.

शासनाच्या स्थगितीमुळे रखडली होती प्रक्रिया

जिल्हा पोलीस दलाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात पहिल्यांदाच 300 हून अधिक कर्मचार्‍यांना एकाचवेळी पदोन्नती देवून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सुखद धक्का दिला होता. यात 94 कर्मचार्‍यांना सहाय्यक फौजदार, 100 कर्मचार्‍यांना पोलीस हवालदार तसेच 122 जणांना पोलीस नाईक या पदावर याप्रमाणे एकूण पात्र असलेल्या 316 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली होती.

याबाबतचे आदेशही 16 एप्रिल रोजी पारित झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर या पदोन्नत्यांना शासनाने स्थगितीचे आदेश दिले होते. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस दलातील पदोन्नत्यांनाही ब्रेक लागला होता.

शासनाने 20 मे रोजी सुधारीत आदेश काढून पदोन्नत्यांवरील स्थगितील उठविली होती. तसेच प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला होता.

सहाय्यक फौजदारपदी कर्मचार्‍यांना यापूर्वीच पदोन्नती

एप्रिल महिन्यात राबविण्यात आलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेत पात्र कर्मचार्‍यांची संख्या एकूण 316 अशी होती. मात्र यात सहाय्यक फौजदारपदी असलेल्या निकषानुसार दोन कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले होते.

त्यानुसार या दोन कर्मचार्‍यांना वगळण्यात आले. त्यानुसार दोन सहाय्यक फौजदार कर्मचारी कमी झाल्याने,

पोलीस हवालदारपदाचेही दोन तसेच पोलीस नाईक पदासाठीचेही दोन असे सहा कर्मचारी कमी झाले होते. यामुळे एकूण कर्मचार्‍यांची संख्या 316 वरुन 310 झाली होती. 31 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी मनुष्यबळाचा विचार करता, 28 मे रोजी 92 जणांना सहाय्यक फौजदारी पदोन्नतीबाबतचे आदेश पारित करुन पदोन्नती देण्यात आली होती.

शासनाचे पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढलेले आदेश कायम ठेवण्यात आले. 92 कर्मचार्‍यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती दिल्यानंतर उर्वरीत पात्र जिल्हाभरातील 220 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश गुरुवारी पारित करण्यात आले. यात 98 कर्मचार्‍यांना पोलीस नाईकपदाहून

पोलीस हवालदारपदी तर, 120 कर्मचार्‍यांना पोलीस शिपाईवरुन पोलीस नाईकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. कार्यरत आहे, त्यातच ठिकाणी कर्मचार्‍यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळाल्याने प्रतिक्षेतील अनेक कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com