जिल्ह्यातील 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील

रद्द केलेली प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे शासनाचे आदेश; जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
जिल्ह्यातील 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच एकाचवेळी 316 कर्मचार्‍यांना जंबो पदोन्नती देण्यात आली होती. शासनाने पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले होते.

रद्द केलेली पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. काही दिवस प्रतिक्षा करणार आहे. जिल्ह्यातील 316 कर्मचार्‍यांच्या काढलेले पदोन्नतीचे आदेश कायम ठेवणार असून याबाबतचे आदेशही लवकरच काढणार आहेत.

डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

आता पुन्हा शासनाने पदोन्नतीची प्रकिया रद्द करण्याचे आदेश मागे घेतले असून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश नुकतेच पारीत केले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या 316 कर्मचार्‍यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचा हा लाभ मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दै.देशदूतशी बोलतांना दिली.

दरम्यान शासनाच्या नवीन आदेशानुसार पूर्वी काढलेले 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश कायम ठेवण्यात येणार असल्याचेही डॉ. मुंढे यावेळी म्हणाले.

सेवा ज्येष्ठनुसार पात्र पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस हवालदार या कर्मचार्‍याची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील 316 पोलिस कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे जम्बो आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 16 एप्रिल रोजी काढले होते. त्यानुसार 94 कर्मचार्‍यांना पोलीस हवालदार पदावरुन सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

तर 100 कर्मचार्‍यांना पोलीस नाईकपदावरुन पालीस हवालदारपदी तर 122 कर्मचार्‍यांना पोलीस कॉन्स्टेबल पदावरुन पोलीस नाईक पदी नियुक्ती देण्यात आली होती. परंतु अवघ्या आठवड्याभरातच 20 एप्रिल रोजी शासनाने ही प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसारच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 316 कर्मचार्‍यांची पदोन्नती रद्द केल्याबाबतचे आदेश पारित केले होते.

काही दिवसांच्या प्रतिक्षा

पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करण्याचे शासनाच्या आदेशामुळे जिल्हा पोलीस दलातील पात्र कर्मचार्‍यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

मात्र शासनाने पदोन्नतीची प्रकिया राबविण्याचे आदेश दिल्याने पात्र कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा आनंद हा कायम राहणार आहे. शासनाचे पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाले आहेत.

या आदेशानुसार 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे 16 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढलेले आदेश कायम ठेवले जाणार आहे. प्रक्रिया राबविल्यावर गेल्यावेळीप्रमाणे शासनाकडून रद्दचे आदेश आल्यास, प्रक्रिया रद्द करावी लागते. त्यामुळे आता काही दिवस प्रतिक्षा करणार असून यानंतर 316 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश कायम ठेवल्याबाबत आदेश काढणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे पात्र कर्मचार्‍यांनाही पदोन्नतीसाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com