खासगी रुग्णालयांत उपचारांची लाखोंची बिले चिटोर्‍यांवरच

प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा; अनेक डॉक्टरांसह रुग्णालये रडारवर
खासगी रुग्णालयांत उपचारांची लाखोंची बिले चिटोर्‍यांवरच

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला असून दररोज हजारोंच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहे. अनेक रुग्ण बाधित आढळताच ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे.

परंतु खासगी रुग्णालय त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा बिलाची रक्कम वसूल करीत आहे. मात्र ऐवढेच नव्हे तर रुग्णालयाकडून रुग्णाला पक्के बिल न देत त्यांच्याकडून एका कोर्‍या कागदावर बिलाचा हिशेब लिहून देत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहे. परंतु त्यांच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात अत्यावस्थ असलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहे. ज्या रुग्णांना काही प्रमाणात लक्षणे आहेत अशी रुग्णे खासगी रुग्णालयात दाखल होत असून उपचार घेत आहे.

जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात खासगी रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा घेत काही रुग्णालयांकडून कोविडच्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलाची रक्कम वसूल करीत त्यांची लूट केला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे.

ही लूट थांबविण्यासाठी शासनाकडून खासगी रुग्णलयांना दरपत्रक देखील ठरवून दिले आहे. परंतु रुग्णालयांकडून शासनाच्या हे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.

खासगी रुग्णालयात बाधित रुग्णाने उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देतांना रुग्णालयाकडून तो दाखल असलेल्या दिवसापासून ते त्याचा डिस्चार्ज होणार्‍या दिवसांचा उल्लेख केला जातो.

तसेच या दिवसात त्या रुग्णावर उपचाराचा खर्च नमूद करुन मेडीकलच्या बिलाची रक्कम अ‍ॅड करुन कच्च्चा कादगावरच सर्व हिशोब करुन तो कागद रुग्णाच्या नातेवाईकाकडे दिला जात असल्याचे समोर आले आहे.

अटी-शर्तींचा भडीमार

अनेक खासगी रुग्णालयात दाखल करण्याअगोदर रुग्णालयाकडून अनेक अटी घालून दिल्या जातात. त्यामध्ये रुग्णाला लागणारे औषधी त्यांच्याच मेडीकल मधून घ्याव्या लागतील, मेडीक्लेम आहे की नाही, अ‍ॅडव्हान्स रक्कम जमा करावी लागेल, रुग्णाला रेमडेसिविर लागल्यास ते तुम्हालाच आणून द्यावे लागेल यासह अनेक जाचक अटी त्यांच्याकडून घालून दिल्या ात आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना या अटी मान्य झाल्यानंतरच त्या रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टर पुढे येत असल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाकडून सरप्राईज व्हीजीट आवश्यकता

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून 1 लाख 71 हजारांचे बिल रुग्णालयाने वसूल केले. रुग्णाच्या नातेवाईकाने याबाबतची तक्रार लेखापरिक्षणअधिकार्‍याकडे केली.

यावेळी स्वत: लेखापरिक्षणअधिकार्‍यांनी संबंधित रुग्णालयात धाव घेत अव्वाच्या सव्वा घेतलेले पैसे रुग्णाला परत केले असून त्याच्याकडून केवळ 60 हजार रुपये बिलापोटी वसूल करण्यात आले. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासाने अशा रुग्णालयात सरप्राईज व्हिजीट देवून अशा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे.

व्हेंटीसाठी 25 हजार रुपये रुग्णांच्या संख्ये वाढ होत असतांना खासगी रुग्णालयांकडून प्रचंड लूट केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या आयसोलेशनसाठी 10 हजार प्रति दिवस तर आयसीयू व व्हेंटीलेटरसाठी 20 ते 25 हजार रुपये प्रतिदिवस याप्रमाणे रुग्णाकडून पैसे वसूल केले जात आहे.

याबाबतचा सर्व हिशोब त्यांच्याकडून एका कोर्‍या कागदावर करुन त्याच्यावर केवळ एक सही करुन हे बिल रुग्णांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करुन वसूल केले जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांकडून अशा प्रकारे चिटोर्‍यांवर बिले देणार्‍या रुग्णालयांवर कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com