मनपातर्फे पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापौर, उपमहापौरांकडून स्वच्छतेचे आदेश
मनपातर्फे पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

येथील प्रभाग क्र. 15 व 18 या दाट लोकवस्ती असलेल्या देशमुखनगर, इक्बाल कॉलनी व मलिकनगरलगत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील रिलायन्स पेट्रोलपंपानजीकच्या मोठ्या पुलाखालील नाला सफाईसह गाळ, अडकलेली झाडेझुडपे पोकलँडच्या सहाय्याने काढण्याच्या कामाला आज सकाळी अकराच्या सुमारास महापालिकेतर्फे महापौर जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात करण्यात आली.

या नाल्यासह मेहरुणमधील महादेव मंदिरानजीकचा तसेच श्रद्धा कॉलनी परिसरातील नाला सफाईचे काम होणार असून, येत्या चार-पाच दिवसांत ते पूर्णत्वास येईल.

यावेळी महापालिका आरोग्य विभागांतर्गत प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, बांधकाम अभियंता मराठे, प्रभाग समिती अधीक्षक धांडे, एस. बी. बडगुजर, आरोग्य निरीक्षक हेमंत ढंढोरे, मक्तेदार रईस शेख, अल्ताफ शेख, इक्बाल काझी यासह कर्मचारी व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

महापालिकेद्वारे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरातील चारही प्रभाग अधिकार्‍यांसमवेत शहरातील लहान-मोठे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात या कामांसाठी लागणार्या पोकलँडसंदर्भात निविदा काढण्यावर चर्चा झाली.

त्या अनुषंगाने निविदा काढण्याचे काम सुरू असून, ज्या प्रभागांसाठी मक्तेदारांनी कामे घेतली आहेत. त्यांनी ती सुरू केली आहेत. त्याचाच भाग म्हणून लहान नाले सफाईचे काम सुरू झाले असून, आठ-दहा दिवसांत ते पूर्णत्वास येणार आहे.

आज मेहरुण तलावातील सांडवा तसेच देशमुखनगर, इक्बाल कॉलनी व मलिकनगर, महामार्गावरील मोठ्या पुलाखालील, मेहरुणमधील महादेव मंदिरानजीकचा तसेच श्रद्धा कॉलनी परिसरातील नाला सफाईच्या कामांना सुरवात करण्यात आली. यामध्ये संबंधित नालेसफाईसह त्यातील गाळ, प्लास्टिक पिशव्या, कचरा, झाडेझुडपे काढून ते प्रवाही केले जातील. ही कामे चार-पाच दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर संबंधित नाल्यांत डास, मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके टाकून फवारणीही केली जाईल .

महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी परिसरात ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांच्याशी चर्चा करून स्वच्छतेचे आदेश दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com