जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

तालुक्यातील चिंचोली शिवारात नवीन विद्युत लाईनचे काम सुरु असतांना आज बुधवारी दुपारी दोन वाजता विजेच्या जोरदार धक्क्याने विशाल नुकूल गायकवाड (वय 18,रा.मोंढाळा, ता.भुसावळ) या वीज कामगार मजूराचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विद्युत पुरवठा खंडीत न करता काम करत असतांना ही दुर्घटना घडल्याने कामगारांनी कंत्राटदारावर चांगलाच संताप व्यक्त केला.

जखमी दोघे जिल्हा रुग्णालयात दाखल

नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरु आहे. या कामावर भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील कामगार रोज कामाला येत आहेत.

बुधवारी दुपारी पोल उभे केले जात असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलला हातात धरलेल्या विशाल गायकवाड यास मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने विशाल याच्या शेजारी उभे इतर कामगार ईश्वर एकनाथ शेळके (35), अक्षय वसंत घ्यार (22) हे लांब फेकले गेले.या घटनेत विशाल याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय व ईश्वर हे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकुलत्या एक मुलाचा मृत्यूने आक्रोश

या घटनेनंतरकामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांना घटनेची माहिती कळविली परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी कामावरील सुपरवायझर वसंत घ्यार यांच्यावर संताप व्यक्त केला. वीज पुरवठा खंडीत न करता हे काम करत असल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला.

विशाल हा अविवाहित होता तर त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले होते. त्याच्या पश्चात्त वडील सोपान उर्फ नुकुल देवचंद गायकवाड, आई छाया असा परिवार आहे. वडील मजुरी करतात. एकुलता एक मुलगा विशालच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.