जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वीज उपकेंद्र मंजुरीला देणार प्राधान्य !

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी 22 कोटींच्या कामांना मान्यता
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वीज उपकेंद्र मंजुरीला देणार प्राधान्य !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य देणार असून यंदा तब्बल 22 कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मागील वर्षी 14 कोटी तर यावर्षी 22 कोटी असा 2 वर्षात विक्रमी म्हणजे 36 कोटींच्या कामांना मान्यता देऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी हिताचा वसा जोपासल्याचे दाखवून दिले आहे.

जिल्ह्यात वीज विषयक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवल्या होत्या. यात शेतीचे पंप वारंवार जळणे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उद्भवत असल्याने लोकप्रतिनिधींनी वारंवार नवीन ट्रांसफार्मर बसविण्याबाबत मागणी होत होती.

या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी करून डी.पी.डी.सी.च्या बैठकीत याबाबत निधी वाढीसाठी चर्चा झाली होती.

याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तब्बल 22 कोटी निधी मंजूर केल्यामुळे शेतकर्‍यांंसह नागरिकांच्या सर्वात महत्वाच्या समस्येचे निराकरण होण्यासाठी मदत झाली आहे.

पालकमंत्र्यांचे मुदतीत व दर्जेदार काम करण्याचे निर्देश

सन 2018 - 19 पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत म्हणजेच डीपीडीसी अंतर्गत या कामांसाठी वर्षाला केवळ 2 कोटी रुपये मंजूर होत होते.

मात्र, मागील वर्षापासून वीज समस्यांची पूर्णपणे जाण असलेले व शेतकर्‍यांंच्या हितासाठी शिंगाडे मोर्चे काढण्यासाठी ख्यात असलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आता जिल्ह्याची धुरा हाती असतांना शेतकर्‍यांंना कृषी वापरासाठी अडचण होऊ नये, यासाठी ना.पाटील यांनी गंभीर दखल घेऊन मागील वर्षी सदर 194 कामांसाठी 16 कोटी 55 लक्ष निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता.

तर यावर्षी तब्बल 437 कामांसाठी 21 कोटी 92 लक्ष 66 हजाराचा निधी मंजूर केला असून मुदतीत व दर्जेदार काम करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील महिन्यात झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत खासदार आमदार व सर्व लोकप्रतिनिधींना प्रस्ताव सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या होत्या.

त्यानुसार यावर्षी यावर्षी 437 कामांबाबत 21 कोटी 92 लक्ष 66 हजार तर मागील वर्षी 14 कोटी 55 लक्ष असे 2 वर्षात सुमारे 31 कोटी रुपये निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे.

तसेच सन 2021-22 या चालू वर्षीही जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीवर भर देणार असल्याचेही माहिती ना. पाटील यांनी दिली आहे.

तालुकानिहाय मंजूर कामे

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अमळनेर - मंजूर कामे 13 : निधी 64.10 लक्ष ; भडगाव - 11 कामे : 52.79 लक्ष ; पाचोरा - 40 कामे : 217.92 लक्ष ; भुसावळ -39 कामे : 212. 55 लक्ष ; बोदवड - 56 कामे - 282. 79 लक्ष ; मुक्ताईनगर - 17 कामे : 65.02 लक्ष ; चाळीसगाव - 11 कामे : 51.09 लक्ष ; चोपडा - 29 कामे : 172.13 लक्ष ; धरणगाव - 55 कामे : 216.04 लक्ष ; जळगाव - 52 कामे : 276.10 लक्ष ; जामनेर - 39 कामे : 212.54 लक्ष ; एरंडोल - 13 कामे : 74.52 लक्ष ; पारोळा - 9 कामे : 44.63 लक्ष ; रावेर- 41 कामे : 191.16 लक्ष ; यावल - 15 कामे : 62.53 लक्ष .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com