राजकीय आखाडा

सप्ताह घडामोडी - लालचंद अहिरे
राजकीय आखाडा

जिल्हा परिषद, नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सात ते आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यादृष्टीकोनातून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रस या मुख्य राजकीय पक्षांनी आगामी होणार्‍या निवडणुकांची पूर्वतयारी सुरु केली आहे.

अलिकडेच शिवसेना नेते खा.संजय राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा घेऊन जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची गर्जना केली. तसेच नवीन दोन जिल्हाप्रमुख आणि तीन उपसहसंपर्कप्रमुखांची नियुक्ती करीत संघटन बांधणीवर जोर दिला आहे आणि आता दुसर्‍या फळीत काम करणारे जिल्हाउपप्रमुखांची नियुक्ती करुन जोरदार मोर्चेबांधणीसह आगामी निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे,जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी ग्रामीण भागात युवक जोडो अभियान व संपर्क अभियान राबविण्याचा नारा दिला आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.

तर जिल्ह्यात रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघा भाजपचे दोन खासदार, जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव विधानसभा मतदार संघात चार आमदार असून विधानपरिषदेचा एक आमदार असे संख्या बळ आहे. तसेच भाजपची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. त्यादृटीने भाजपा नेते गिरीश महाजन यांनी नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज रहा, असा संदेश दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात भाजपाची कसोटी लागणार आहे.

तर जिल्ह्यात काँग्रेसचा एक आमदार, चार जिल्हा परिषद सदस्य असून महापालिकेत एकही काँग्रेसचा नगरसेवक नाही. मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हाध्यक्षांसह नव्याने खांदेपालट करण्याची तयारी केली जात असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. एकंदरीत सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकासाठी साखरपेरणी करीत असून जळगाव जिल्हा कोणत्या राजकीय पक्षाचा बालेकिल्ला राहणार याविषयी येणारा काळच ठरवेल,एवढे मात्र खरे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com