जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील शून्य ते 5 वर्ष वयोगटातील 3 लाख 86 हजार 936 बालकांना 31 जानेवारी पोलिओ डोस देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यात 3 हजार 04 बूथ लावण्यात आले होते.

ग्रामीण व शहरी भागात सकाळी 8 ते 5 वाजेच्या दरम्यान आरोग्य विभागाकडून पल्सपोलिओ मोहीम राबविण्यात आली.जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय पल्सपोलिओ मोहिमेचा प्रारंभ राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला.

जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रविवारी सकाळी पालकमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, नाशिक आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एन. पट्टणशेट्टी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी.तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, अधिसेविका कविता नेतकर,डॉ अभिषेक ठाकूर आदी उपस्थित होते. दरम्यान, ग्रामीण भागात 2 लाख 74 हजार 506 पैकी 2 लाख 69 हजार 112 तर मनपा 60 हजार 910 पैकी 36 हजार 311 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

रुद्राक्ष पाटीलला पहिला पल्स पोलिओचा डोस

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दीपप्रज्वलन करीत मोहिमेचे उद्घाटन केले. त्यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पहिला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यानंतर विलिनी विश्वजित चौधरी, नितिका आकाश चतुर यांसह रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बालकाला लस पाजल्याची डाव्या हाताच्या करंगळीवर खूण करण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक पालकाने पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.

महापौरांच्या हस्ते लसीकरण

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव शहर मनपाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते लहान बाळाला पोलिओचे दोन थेंब पाजून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विरेन खडके, महेश चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, परिचारिका मारिया आरोले, संगीता पाटील, ज्योत्स्ना वासनिक, सनेर आदी उपस्थित होते. महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते चिमुकली दिविशा वाणी हिस पोलिओचे दोन थेंब देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ लस देण्यात आला. पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील 1 ते 5 वर्ष वयोगटातील 61 हजार 98 मुलांना डोस देण्याचे नियोजन केले आहे. रविवारी संपूर्ण शहरात 193 बूथ तयार करण्यात आले होते. संपूर्ण बूथवर 546 कर्मचारी आणि 36 पर्यवेक्षकांनी सेवा बजावली. आज या मोहिमेतून सुटेलेल्या बालकांना रविवारनंतर शहरात 5 दिवस फिरती मोहीम राबविण्यात येणार असून बालकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. मोहिमेसाठी 172 पथक तयार केले होते.

लसीकरणात यांचा होता सहभाग

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन पूजा बर्हाटे, माधुरी सुरवाडे यांनी केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका विद्या राजपूत, अर्चना धिमते, जयश्री वानखेडे उपस्थित होते. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी अधिपरिचारिक रोहित देसाई, संपत मल्हार, अधिपरिचारिका कुमुद जवंजार, कक्षसेवक मंगेश बोरसे, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे, सुधीर करोसिया, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी तसेच श्रीमती धीमते, जयश्री वानखेडे, विद्या राजपूत, रोहित देसाई, संपत मल्हार, अधिसेविका नेटकर, कांबळे, मिलिंद लोणारी आदींनी परिश्रम घेतले.