पोलीस अधीक्षकांमुळे तब्बल ११ वर्षानंतर आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया

प्रतिक्षेतील पात्र कर्मचार्‍यांना मिळाला न्याय : डॉ. प्रवीण मुंढे यांच्या निर्णयाचे स्वागत
पोलीस अधीक्षकांमुळे तब्बल ११ वर्षानंतर आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया

किशोर पाटील - जळगाव :

प्रत्येक शासकीय विभागाप्रमाणे जिल्हा पोलीस दलातही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली जाते. शासनाने प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र एकूण कर्मचार्‍यांपैकी ५ टक्के जागा भरण्यास मुभा दिली असून हे पोलीस अधीक्षक यांच्या अधिकारात आहे.

शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी प्रत्येक वर्षी पाच टक्के प्रमाणे कर्मचारी घेण्यास मुभा दिली आहे. त्याचा आधार घेवून ही प्रक्रिया राबविली. पात्र जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. २०१० ते आजपावतो एकूण कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकाला प्राधान्य देण्यात येवून आतापर्यंत १६१ कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीनुसार स्वीकृती दिली आहे, त्याचे समाधान आहे. प्रत्येक वर्षी याच पध्दतीने ही प्रक्रिया राबविल्यास लवकरच प्रतीक्षेतील कर्मचार्‍यांना न्याय मिळेल.

डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक.

२०१० पासून जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक बदलले मात्र केवळ शिफारशींनुसार पाच ते दहा कर्मचार्‍यांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यात . आपल्या हक्कांच्या या बदल्यांपासून अनेक कर्मचारी वंचित होते.

त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मनावर घेतले, अन् स्वतः जातीने लक्ष देवून रखडलेली ही प्रक्रिया कर्मचार्‍यांमार्फत राबवून घेतली. त्यानुसार इतर जिल्ह्यातूून जळगाव जिल्ह्यात येऊ इच्छिणार्‍या ५७५ कर्मचार्‍यांपैकी यंदा १६१ जणांना आंतरजिल्हा बदलीनुसार जिल्ह्यात येण्यास स्विकृती मिळाली असून त्यापैकी ६२ जण हजरही झाले आहेत.

तब्बल ११ वर्षानंतर झालेल्या या सुलभ प्रक्रियेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मुंढे यांच्या निर्णयाचे स्वागत पोलीस प्रशासनात होत आहे.

आतापर्यंत केवळ कागदोपत्रीच झाली प्रक्रिया


पोलीस दलात आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र कर्मचार्‍यांकडून ठरलेल्या प्रकियेनुसार अर्ज करण्यात आले. प्रत्येक वर्षी पात्र ५ टक्के याप्रमाणे पात्र कर्मचारी आंतरजिल्हा बदलीनुसार घेेणे अपेक्षित असतांना याकडे तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

अर्ज करणार्‍यांपैकी मंत्री, राजकीय पुढारी यांच्यासह इतरांच्या शिफारशीनुसार कर्मचारी घेतले गेले. अशाच पध्दतीने २००१ ते २०१० दरम्यान आलेल्या प्रत्येक पोलीस अधीक्षकांनी केवळ शिफारशींनुसार दरवर्षी १५ ते २० कर्मचारी घेतले. इतर जण प्रतिक्षेतच राहिलेत.

२०१० मध्ये असलेल्या पोलीस अधीक्षकांनी एक स्वतंत्र रजिस्टर तयार करुन आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची त्यात नोंद घेतली.

मात्र आंतरजिल्हा बदलीपात्र कर्मचार्‍यांना घेण्यात आले नाही. तेव्हापासून ते आधीच प्रलंबित असलेले अर्ज व यात प्रत्येक वर्षी पात्र कर्मचारी करत असलेले अर्ज यामुळे यादी लांबलचकच होत गेली.

मात्र अधिकारात असतांनाही एकाही पोलीस अधीक्षकाने संबंधित कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया राबविण्याची हिम्मत दाखविली नाही.

अर्ज केलेल्या प्रत्येक कर्मचार्‍याला प्राधान्य

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी रूजू झाले. रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान महिनाभरानंतर डॉ. मुंढे यांना आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांची लांबलचक यादी असून कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित असल्याचे लक्षात आले.

त्यांनी तात्काळ संबंधित प्रकियेसंदर्भात कार्यालयीन कर्मचार्‍यांनी सुरुवातीपासून अर्ज करणार्‍या प्रत्येकांची तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या रजीस्टर अपडेट केले. त्यानुसार पात्र कर्मचार्‍यांचा अर्ज तपासून २०१० पासून ते आजपावेतो कर्मचार्‍यांनी यादी तयार केली.

सप्टेंबर २०२० पर्यंत ५७५ कर्मचारी बदलीच्या प्रतिक्षेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अर्ज करणार्‍या प्रत्येक पात्र कर्मचार्‍याची आंतरजिल्हा बदलीबाबतची प्रक्रिया राबविली. यात संबंधित कर्मचार्‍यांना कळविण्यात आले.

वर्षनिहाय अर्ज करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्राधान्य दिले. व पारदर्शक पध्दतीने ही प्रक्रिया राबविली. यात फक्त पती-पती एकत्रीकरण यासह इतर कौटूंबिक कारणास्तव कर्मचार्‍यांनाही प्राधान्य देण्यात आले.

अशी आहे कर्मचार्‍यांची संख्या
प्रलंबित एकूण ५७५
आजपर्यंत स्वीकृती दिलेले कर्मचारी १६१
हजर झालेले कर्मचारी ६२
स्वीकृती रद्द केलेले कर्मचारी २१
बदलीनंतर हजर न झालेले कर्मचारी ७८
शिल्लक एकूण प्रस्ताव ४१४

वर्षनिहाय शिल्लक प्रस्ताव असे

वर्ष - संख्या
२०१५ - ५२
२०१६ - ८५
२०१७ - १०६
२०१८ - १००
२०१९ - ४३

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com