ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत लपून बसले पोलिस ; अन पकडले 5 डम्पर

नगरसेवक कुलभूषण पाटील विरुध्द संघटित गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत लपून बसले पोलिस ; अन पकडले 5 डम्पर

जळगाव/प्रतिनिधी- Jalgaon

शहरापासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळूउपशावर धरणगाव पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 5 डम्पर जप्त केले. दरम्यान या कारवाईप्रकरणी नगरसेवक कुलभूषण पाटील याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत लपून पोलिसांनी सापळा लावत वाळू वाहतूक करणार्‍यांवर ही कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी पाहणी केली होती. त्याच कारवाईचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पो.कॉ. विनोद संदांशिव, पो.ना. मिलिंद सोनार, पो.कॉ. प्रवीण पाटील, वसंत कोळी, होमगार्ड सुदर्शन पाटील, निखिल चौधरी, तुषार पाटील, राहुल पाटील यांच्या पथकाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस पथकाने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्‍याला टोळीला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला. यावेळी त्यांना एम.एच. 19 झेड. 5417 वरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा.सावदे प्र.चा, ता.एरंडोल), डंपर क्रमांक एम.एच. 19 बी.एम 7557 वरील चालक अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाने ता.जळगाव), डंपर क्रमांक एम.एच. 19 झेड 7557 वरील चालक भगवान सोमा सोनवणे (रा. बांबोरी प्र.चा धरणगाव), डंपर क्रमांक एम.एच. 19 बीएम 5656 वरील चालक सचिन शंकर पाटील (रा.शेंदुर्णी ता. जामनेर), डंपर क्रमांक एम.एच. 20 सिटी 5247 वरील चालक सिद्धार्थ अशोक अहिरे (रा.पिंपळकोठा प्र.चा ता.एरंडोल), मोटारसायकल क्रमांक एमएच 19 2147 वरील वॉचर म्हणून काम करणारे दोन मुले मुकुंदा राजू पाटील (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता.एरंडोल) असे मिळून आले.

यातील डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणत्याही पोलीस कर्मचारीला दुखापत झाली नाही. डंपर चालक यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मालकांचे नाव आनंद सपकाळे, बाळू चाटे, उदय राजपूत, सचिन पाटील असे सांगितले.

या गुन्ह्याच्या फिर्यादीत ठेकेदार कुलभूषण पाटील (रा.जळगाव) याने मला पैसे द्या, मी नदीपात्रातून चोरलेली वाळू माझ्या ठेक्यावरून आणली, असे सांगून तुम्हाला त्याच्या पावत्या देतो असे सांगत सर्वांना एकत्र आणून संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले असे निष्पन्न झाले असल्याचे म्हटले आहे.

सदर गुन्ह्यात एकूण 12 आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात भादवि कलम 307, 379, 511 सह गौण खनिज खनिज अधिनियम कलम 21 सह कलम 202/177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 लाख 18 हजाराचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात 5 डंपर 1 ब्रास वाळू मोटारसायकल, मोबाईल असा ऐवज आहे. यातील पाच चालक व मोटरसायकलवरील दोन पंटर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

गिरणा काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून शासनाच्या महसूल बुडविला जातो वाढदिवस येथील सैनिक सराईत गुन्हेगार व महसूल व पोलिस प्रशासनावर वचक नेमणूक गौण खनिज चोरी करतात यापुढे नदीपात्रा जवळ फिरणार्‍या डंपर ट्रॅक्टर मोटरसायकल यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com