व्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झालेला पोलीस नाईक अटकेत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : अमळनेरला कारवाईदरम्यान झाला होता फरार
व्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झालेला पोलीस नाईक अटकेत

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान विभागाचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊन धरणगाव पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे हा फरार झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या फरार पोलीस नाईक विलास सोनवणे याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून अटक करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील भारत छगन पाटील यांच्याविरुद्ध भगवान हरी पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यात ते जामिनावर सुटले होते. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, तुला निर्दोष सुटायचे असेल तर मला 19 हजार रुपये दे अन्यथा कोर्टात कडक रिपोर्ट पाठवेल असा दम पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यांनी भारत पाटील यांना दिला होता. भारत पाटील यांनी 5 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

विलास सोनवणे याने भारत पाटील यांना पैसे देण्यासाठी 6 मार्च रोजी संध्याकाळी अमळनेर बसस्टँड जवळ बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच घेऊन भारत पाटील यांच्या गळ्यात व पॅन्टच्या खिश्यात व्हॉइस रेकॉर्डर ठेवून 6 मार्च रोजी रात्री 10 वाजता बाजार समितीच्या गेट जवळ सापळा रचला होता. भारत पाटील याने काही रक्कम कमी करा असे सांगितले तेव्हा विलास ने तुम्हाला जे द्यायचेते द्या असे नाराजीने सांगितले. यादरम्यान विलास सोनवणे यास संशय आल्याने त्याने भारतच्या छातीस हात लावून तपासणी केली असता सरकारी व्हॉइस रेकॉर्डर हाती लागले होते. विलास झटापट करून हे व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून पसार झाला होता.

पथकाने विलासचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही म्हणून निरीक्षक नीलेश लोधी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान फरार असलेला संशयित विलास सोनवणे हा आज जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ असल्याची गोपनीय माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेशसिंग पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकार्‍यांना सोबत घेत विलास सोनवणे यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरिक्षक निलेश लोधी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com