पिंप्राळा रथोत्सव भक्तीचा गजर

146 वर्षांची परंपरा ; दुसर्‍या वर्षीही रथोत्सव साधेपणाने , निर्बंधांमुळे पाच पावले ओढला रथ
पिंप्राळा रथोत्सव भक्तीचा गजर

जळगाव - Jalgaon :

जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासूदेव हरी... असा विठ्ठल नामाचा जयघोषाच्या निनादात पिंप्राळ्याचा रथोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या सावटामूळे दुसर्‍या वर्षी देखील केवळ पाच पाऊले रथ ओढीत रथोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांकडून पांडूरंगाचा जयघोषाने पिंप्राळा नगरी दुमदूमली होती.

प्रती पंढरपूर समजल्या जाणार्‍या पिंप्राळ्यातील श्री. विठ्ठल मंदिर संस्थांनतर्फे आषाढी एकादशीला पांडूरंगाचा रथोत्सव मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरा केला जातो. या रथोत्सवाला यंदा 146 वे वर्ष पूर्ण होत आहे.

सालाबादा प्रमाणे यंदा देखील रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या सावटामूळे व शासनाने घालून दिलेल्या नियमांनूसार रथोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता संस्थानच रुपेश वाणी यांच्याहस्ते उत्सवमुर्तीचा महाअभिषेक करुन मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीची पुजा करण्यात आली.

त्यानंतर रथावर विराजमान होणार्‍या उत्सव मुर्तींची संजय वाणी यांच्या हस्ते अभिषेक करुन पुजा करण्यात आली.

दरम्यान, सकाळी 8 वाजता रथोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाणी यांच्याहस्ते रथाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर 8.30 वाजता मान्यवरांसह भाविकांच्या उपस्थितीत रथाची महाआरती करण्यात आली.

यावेळी वाणी समाजाचे प्रतिनिधी अक्षय वाणी, कल्पेश वाणी, पुजारी श्याम जोशी, भजनी मंडळाचे अरुण पाटील, रमेश महाजन, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, शांतता कमिटी सदस्य संजय सोमाणी, माजी नगरसेवक आबा कापसे, नगरसेवक मयूर कापसे, विजय पाटील, अतूल बारी, पुरुषोत्तम सोमाणी, संस्थेचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनिल वाणी, सचिव योगेश चंदनकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.

रथोत्सवात ग्रामप्रदशीनेची परंपरा सलग दुसर्‍यावर्षी कोरोनामूळे खंडीत झाली. दरवर्षी रथोत्सवानिमित्त मंदिर व रथाला रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात येते. मात्र यंदा रथाची सजावट अत्यंतसाधेपणाने करण्यात आली होती. अनेक भाविकांनी रथाच्या जागेवर जावून रथाचे दर्शन घेतले. तर संस्थानतर्फे यंदा ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने अनेकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेत रथोत्सव साजरा करण्यात आला. ऑनलाईनसाठी दुर्गेश वाणी, गिरीश वाणी, मयूर पंडीत, चिराग वाणी, प्रमोद वाणी, तेजस चंदनकर यांनी परिश्रम घेतले.

दुसर्‍या वर्षीही रथोत्सव साधेपणाने

रथोत्सवानिमित्त पिंप्राळ्यात यात्रा भरत असते. त्यामुळे विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारची खेळणी विक्रीची दुकाने येथे पिंप्राळा रिक्षा स्टॉप चौकात थाटलेली असतात. पंचक्रोशीतून भाविक रथ पाहण्यासाठी पिंप्राळ्यात दाखल होत असतात, परंतु यंदा सलग दुसर्‍यावर्षी कोरोनाच्या नियमांमूळे रथोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

निर्बंधांमुळे पाच पावले ओढला रथ

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव साजरा होत असतो. विठ्ठल नामाचा अखंड गजरात दुमदुमणारी पिंप्राळानगरी यंदाही सुनीसुनीच होंती. गेल्यावर्षीप्रमाणे कोरोनामुळे रथोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आल्याने रथाची ग्राम प्रदक्षिणा न होता परंपरा कायम राखण्यासाठी जागेवरच रथ ओढण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com