ऑक्सिजन बंद पडल्याने सारा हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू

ऑक्सिजन बंद पडल्याने सारा हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू

रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोविड हॉस्पिटलमधील ऑक्जिसनचा पुरवठा खंडीत झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार सायंकाळी मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटलमध्ये घडली.

हॉस्पिटल संबंधित प्रकार माहिती झाला. या हॉस्पिटलला सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा आहे. याप्रकरणाची चौकशी देखील करणार असून उद्या हॉस्पिटलला भेट देणार आहे.

डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकीत्सक

रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकंनी केला आहे.

शहरातील मेहरुण परिसरात डेडिकेटेड सारा हॉस्पिटल असून याठिकाणी गेल्या चाळीस दिवसांपासून प्रतिभा कैलाससिंग परदेशी (वय 48) या करोनावर उपचार घेत आहे.

त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता परंतु त्यांची शरिरातील ऑक्सिजनची पातळी वाढत नसल्याने त्यांच्यावर याठिकाणी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा अचानक खंडीत झाला. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह डॉक्टरांना याबाबत माहिती दिली असता, सुमारे दहा मिनीटानंतर कर्मचारी याठिकाणी आले.

दरम्यान त्या कर्मचार्‍यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशिक्षण नसल्याने सुमारे दहा ते पंधरा मिनीटापर्यंत हा प्रकार सुरु होता.

त्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर याठिकाणी आले असता त्यांनी थोड्यावेळानंतर ऑक्जिसनचा पुरवठा सुरळीत केला. परंतु तो पर्यंत रुग्णाची प्राणज्योत मालवली होती.

ती तरफडत होती परंतु कोणीच आले नाही

माझ्या आईला लावलेल्या ऑक्जिसनचा पुरवठा खंडीत झाला. मी याबाबत खालच्या मजल्यावरील डॉक्टरांना बोलविण्यासाठी गेली परंतु ते आलेच नाही.

त्यामुळे माझी आई पाच ते सहा मिनीटांपर्यंत बेडवरच तरफडत राहीली आणि त्यानंतर तीने जीव सोडला...मात्र तरी देखील कोणीच आल नाही. असे सांगत त्या मयताच्या मुलीने रुग्णालयाच्या आवारात हंबरडा फोडला.

तक्रार केली तर देतात रुग्ण हलविण्याची धमकी

हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांसह डॉक्टरांना उपचारसंबंधी तक्रार केली. तर त्यांच्याकडून तुमचे रुग्ण दुसर्‍या हॉस्पिला घेवून जा अशी धमकी देखील दिली जाते.

तसेच कर्मचार्‍यांना वारंवार विनंती करुन देखील त्यांच्याकडून उर्मटपणाची वागणुक दिली जाते. गेल्या काही दिवसांपासून दोनवेळा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी देखील तक्रार केली होती परंतु कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने आज आम्हाला आमच्या आईचा जीव गमवावा लागल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.

माझ्या घरातील सहा जण गेले आता काय बोलू ?

यापूर्वी कोरोनामुळे परदेशी यांच्या कुटुंबातील पाच जणांचा बळी घेतला आहे. प्रतिभा परदेशी यांचा देखील ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याने त्यांच्या मुलीने या अगोदर माझ्या कुटुंबातील पाच जण गेले. आता माझी आई देखील गेली मी काय बोलाणार असा भावनिक सवाल महापौरांना मयताच्या मुलीने केला.

डॉक्टरांनी फेटाळून लावले आरोप

घटनेची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक चेतन सनकत यांनी सारा हॉस्पिटलमध्ये येत परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांची घटनेबाबत चर्चा केली असता, नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

मनपाच्या पथकाकडून यंत्रणेची पाहणी

घडलेल्या प्रकराबाबत महापौरांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकीत्सकांना याबाबत फोनवरुन माहिती दिली. दरम्यान जिल्हाशल्यचिकीत्सकांनी तक्रार आल्यास आपण याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागासह आरोग्य विभागाचे अधिकारी याठिकाणी आले. त्यांनी कागदपत्रांची पाहणी देखील केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com