परिवर्तनचे कलारंभ शिबीर काळाची गरज

परिवर्तनचे कलारंभ शिबीर काळाची गरज

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे गौरवोद्गार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोविडच्या काळात आपण सगळेच घरात बंदिस्त झालो आहोत. पण या काळात लहान मुलांच्या मनावर आणि एकूणच आकलनावर विपरीत परिणाम झाला आहे.

मुलांची शाळेत होणारी सांस्कृतिक देवाण-घेवाण थांबली. घरी बसून कंटाळलेल्या मुलांच्या आयुष्यात कलेचा आरंभ व्हावा व त्यांचा स्वतःशी संवाद घडावा या संकल्पनेतून परिवर्तन कलारंभ शिबिर आकाराला आले आहे.

कलेचा संस्कार सुसंस्कृत समाज घडवित असतो. योग्य वयात जर कलेचे संस्कार झाले तर व्यक्तीमत्व विकासासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट कुठलीही नाही, परिवर्तनचे कलारंभ शिबीर काळाची गरज असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते परिवर्तनच्या कलारंभच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, परिवर्तनचे शंभू पाटील, हर्षल पाटील आदी उपस्थित होते, त्यांनीही मुलांनी संवाद साधत कला व आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

परिवर्तन कलारंभ शिबिर 11 ते 13 जून असे तीन दिवस दररोज तीन तास कलारंभ-ओळख कलेशी, संवाद स्वतःशी हे ऑनलाईन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी केवळ 30 मुलांची मर्यादा असूनही मुलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे सद्यस्थितीत 55 मुले शिबिरात सहभागी झाली आहेत.

या शिबिरात मुलांना नृत्य, गायन आणि अभिनय या कलांची ओळख करून दिली जात आहे. या अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री मंजुषा भिडे, नाट्यशास्त्राचे शिक्षक विशाल कुळकर्णी व युवा अभिनेत्री प्रतीक्षा कल्पराज, नृत्य कलेसाठी जागृती भिडे व साक्षी माळी तर गायन कलेसाठी गायिका व आहारतज्ज्ञ अनुषा महाजन, तबला वादक मनीष गुरव, शास्त्रीय गायक अक्षय गजभिये व गायिका हर्षदा कोल्हटकर हे मार्गदर्शन करीत आहेत.

या शिबीराचे दोन टप्पे आहेत, तीन दिवस प्रशिक्षणाचे व तीन दिवस हे प्रात्यक्षिकाचे असून यात विद्यार्थ्यांसोबत पालकही सहभागी होतील. शिबिराच्या चौथ्या दिवशी 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेल्या पुणे येथील नामांकित समुपदेशक दिपाली यमु- रमेश अवकाळे या पालकांशी पालकत्वावर संवाद साधणार आहेत.

तिसर्‍या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यावी

कोविडच्या तिसर्‍या लाटे दरम्यान मुलांची काळजी कशी घ्यावी यासाठी शहरातील नामांकित डॉक्टर व रोटरी क्लब मिडटाउनच्या अध्यक्षा डॉक्टर रेखा महाजन पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व तांत्रिक बाजू जितू पाटील सांभाळत आहेत. शिबिराच्या आयोजनासाठी नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, विकास मलारा, विजय जैन, अंजली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, प्रा डॉ किशोर पवार, मनोज पाटील, सुनील बारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com