जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

नाटक, साहित्य, संगीत, नृत्य क्षेत्रात परिवर्तन जळगाव ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. सातत्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती, गंभीर स्वरूपाचे नाटक करणारी व आयोजन करणारी ही संस्था या वर्षी दशकपूर्ती साजरी करीत आहे.

प्रायोगिक स्तरावर उत्तम काम करणार्या परिवर्तनने निर्मित केलेल्या नाटकांचा व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 5,6 व 7 फेब्रुवारी 2021 या काळात तीन दिवस शुक्रवार पेठेतील जोत्सना भोळे सभागृहात परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

खान्देशी मातीचा, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता हे परिवर्तन संस्थेच्या निर्मितीचं वैशिष्ट्य असतं. या तीन दिवसीय महोत्सवाची सुरवात शंभू पाटील लिखित अमृता साहिर इमरोज या नाटकाने होणार आहे. हे वर्ष अमृता प्रीतम यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या अनुषंगाने परिवर्तनने या नाटकाची निर्मिती केली आहे.

अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी व इमरोज यांच्या नात्यावर, साहित्यावर, जीवनावर व एकंदरीत प्रवासावर भाष्य करणारे हे प्रायोगिक रंगभूमीवरचे नाटक आहे. यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित नली एकलनाट्य सादर होणार आहे. याचं नाट्यरूपांतर शंभू पाटील यांचे आहे. या नाटकाचा 47 वा प्रयोग महोत्सवात सादर केला जाणार आहे.

महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी कुरुक्षेत्रानंतर हा नाट्यप्रयोग सादर होईल. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित महाश्वेता देवींना समर्पित हा नाट्यप्रयोग आहे. महोत्सवाचा समारोप शेवटच्या दिवशी 7 फेब्रुवारी, रविवारी ‘हंस अकेला’ या सांगीतिक कार्यक्रमाने होईल. संत कबिरांच्या साहित्याचा व जीवन प्रवासाचा परिवर्तनने सांगीतिक शोध घेतला आहे. खान्देशी मातीचा व भाषेचा गोडवा अनुभवण्यासाठी रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्यावतीने करण्यात आले आहे.