चोपड्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उदघाटन

चोपड्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उदघाटन

लोकसहभातून देशातील पहिला प्रकल्प

चोपडा - Chopda - चंद्रकांत पाटील :

फेब्रुवारी महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने चोपड्यात हाहाकार उडाल्याने शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन तुटवडा भासू लागला.

तहसीलदार अनिल गावित, शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी दखल घेऊन लोकसहभागातून निधीची उभारणी करून उपजिल्हा रुग्णालयात दोन ड्युरा सिलेंडर आणून असंख्य रुग्णांचा जीव वाचविला.

भविष्यात ऑक्सिजन अभावी कोणत्याच रुग्णाचा जीव जाणार नाही यासाठी लोकसहभागातून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

आठच दिवसात निधी जमा होऊन ऑक्सिजन प्लॉन्टची मशिनरी दाखल झाली आहे हवेतून प्रतिदिन सव्वालाख लिटर ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या प्लॉन्टचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उदघाटन होत आहे.

देशात व राज्यात लोकसहभातून उभारला जाणारा चोपड्यातील पहिला प्रकल्प आहे.लोकसहभातून कोरोनाशी लढा देण्यात मोठे यश मानले जात आहे.

करोना संसर्ग झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली.सर्वच काही शासन देऊ शकत नाही म्हणून तहसीलदार अनिल गावित,शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी लोकसभागातून निधी उभारण्याचे जनतेला आवाहन केले.

आठ दिवसात 6 लाख 50 हजाराचा निधी जमा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात 90 बेडला ऑक्सिजन पाईप लाईन सह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारीत आलेल्या दुसर्‍या लाटेचा भयंकर विस्फोट झाल्याने हाहाकार उडाला.त्यात शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला.कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्याने ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला.

या संकटावर मात करण्यासाठी लोकसहभागातून ऑक्सिजनच्या दोन ड्युरा टँकसाठी आर्थिक मदतीची हाक देण्यात आली.अवघ्या पाच दिवसात 5 लाख रुपये निधी जमा होऊन दि.4 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन चे दोन ड्युरा टँक बसविण्यात आले.त्यामुळे मोठे संकट टळून अनेकांचे जीव वाचला.

प्लॉन्ट उभारण्यासाठी तहसीलदार अनिल गावित व कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी विविध सामाजिक संघटना, शेतकरी,व्यापारी,शिक्षक,पोलीस व शासकीय कर्मचारी डॉक्टर आदींना पुन्हा लोकसभागातून 12 लाख रुपये निधी उभारण्याचे आवाहन केले.

तत्पूर्वी हातेड खु! येथील उद्योजक राहुल सोनवणे यांनी स्वतःपुढाकार घेऊन मुंबई येथील कंपनीला खिशातून अडव्हॉन्स देऊन मशिनरीची ऑर्डर दिली.दात्यांकडून आज पावेतो साडेदहा लाखाचा निधी जमा झाला असून,मदतीचा ओघ सुरू आहे.ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या प्लॉन्ट ची मशिनरी चोपड्यात दाखल झाली आहे.

सध्या उपजिल्हा रुग्णालयात प्लॉन्ट उभारणीचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती होणार असून,21 जंबो सिलेंडरची गरज भागणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचे संकट कायमचे दूर होऊन असंख्य कोरोना रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. कोरोना महामारीत लोकसहभागातून ऑक्सिजन पाईप लाईन,मेडिसिन बँक,ऑक्सिजन ड्युरा टँक व हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून असंख्य कोरोना रुग्णांचे प्राण वाचवून चोपडा तालुका महाराष्ट्रात नव्हे तर देशात व महाराष्ट्रात मॉडेल बनला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com