अर्ध्यावरती डाव मोडला...

मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने विष प्राशन करुन संपविले जीवन
अर्ध्यावरती डाव मोडला...

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मामाच्या शेजारी राहणार्‍या मुलीशी तिच्या घरच्यांना न सांगता गुपचूप प्रेमविवाह केला. मात्र या प्रेमविवाहाची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाली.

तिच्या वडीलांसह भावासह दोन ते तीन जणांनी तरुणाच्या मामाचे घर गाठून यापूढे मुलीची संबंध ठेवायचा नाही असे सांगत सर्व तरुणासह त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जीवे मारण्याच्या भितीने तसेच आता आपली प्रेमकहाणी अधुरी राहिली, या नैराश्यातून चिराग बाबुलाल पांडे वय 28 रा.

शिवाजीनगर या तरुणाने 12 जुलै रोजी दुपारी मामाच्या गावाहून जळगावातील त्याच्या घरी येवून विषप्राशन केल्याची घटना घडली. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता त्याचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मयत चिराग याचा मामा हरिष पुरोहित यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, शिवाजीनगर येथील चिराग बाबुलाल पांडे हा तरुण दहा ते 11 वर्षापासून त्याचे मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथील मामा हेमंत पुरोहित यांच्याकडे वास्तव्यास होता.

चिरागचे वडील आई तसेच लहान भाऊ हे शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. चिरागचे वडील दाणाबाजारात एका दुकानावर कामाला आहे. रतलाम येथे मामाकडे राहत असतांना, चिराग याचे मामाच्या घराशेजारी राहणार्‍या डॉक्टर असलेल्या तरुणीशी सुत जुळले. आठ वर्षाच्या मैत्रीतून प्रेम बहरले. घरी कळले तर विरोध होईल, त्यामुळे मुलीने तिच्या कुटुंबियांना न कळविता, चिरागसोबत 14 फेब्रुवारी 2021 रोजी रतलाम येथे विवाह नोंदणी कार्यालयात जावून विवाह केला.

विवाहानंतर तरुणी ही तिच्याच घरी राहत होती. तर चिराग हा मामाच्या घरी राहत होता. मुलीच्या घरच्यांना विरोध होईल या भितीने दोघेही पळून जाण्याच्या विचारात होते. मात्र चिराग याचे मामा तसेच कुटुंबियांनी त्या विरोध केला.

मुलीच्या कुटुंबियांनी घरी येवून दिली होती धमकी

10 जुलै रोजी चिरागचे मामा तसेच कुटुंबियांनी मुलीचे घरी जावून तिच्या कुटुंबियांशी समजूत घातली. तसेच दोघांच्या प्रेमविवाहास परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर कुटुंबिय घरी निघून आले. यावेळी चिरागची आई अनिता तसेच त्याची मावशी हे सुध्दा चिरागच्या भेटीसाठी रतलाम येथे आलेले होते.

दुसर्‍या दिवशी 11 जुलै रोजी मुलीचे वडील विजय राठोड, काका भरत राठोड, भाऊ अंश राठोड, विशाल राठोड व भावाचे मित्र अशोक तिवारी, आशिष शिवरे यांनी चिरागच्या मामाचे घर गाठले. यावेळी न्यायालयात केलेल्या दोघांच्या विवाहाला आम्ही मानत नाही.

यापूढे मुलीला मेसेज अथवा फोन करायचा नाही, तसेच तिच्याशी कुठलाच संबंध ठेवायचा नाही. नाहीतर तुम्हा सर्वांना घराबाहेर निघणे मुश्किल करुन टाकू, तसेच चिरागसह सर्व कुटुंबियांना जीवे ठार मारु, सर्वांना कापून फेकून देवू, अशी धमकी दिली, अशी माहिती चिरागचे मामा हेंमत पुरोहित यांनी दिली.

भीतीपोटी जळगावात येऊन केली आत्महत्या

मुलीच्या कुटुंबियांनी घरी येवून दिलेल्या धमकीमुळे चिरागला भिती वाटली. 12 जुलै रोजी पहाटे 4 वाजता चिराग रतलाम येथून जळगावात आला. आई रतलाम व लहान भाऊ रतलाम येथे तर वडील दुकानावर गेलेले होते. शिवाजीनगर येथील घरी कुणीही नसल्याची संधी साधत दुपारी 1 वाजता चिरागने विषप्राशन केले.

विषप्राशन केेल्यावर बहिण पायल हिस फोन केला, बहिणीला शंका आल्याने त्याने मावशीचा मुलगा निर्मल यास शिवाजीनगर जाण्याचे सांगितले. निर्मलने शिवाजीनगर गाठले, दरवाजा आतून बंद होता, कुणीही प्रतिसाद देत नसल्याने निर्मलने दरवाजा तोडला. यावेळी निर्मल घरात पडलेला होता, तर त्याच्या शेजारी विषाची बाटली होती, निर्मलने तत्काळ चिरागला जिल्हा रुग्णालयात हलविले, प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात हलविले.

खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता चिरागची प्राणज्योत मालवली. दरम्यान मुलीचे वडील विजय राठोड, काका भरत राठोड, भाऊ अंश राठोड, विशाल राठोड व भावाचे मित्र अशोक तिवारी, आशिष शिवरे यांनी घरी येवून धमकी दिल्यामुळेच, भितीने चिराग याने आत्महत्या केली आहे, चिरागच्या मृत्यूस संबधित सर्व कारणीभूत असल्याचा आरोप चिरागचा मावसभाऊ निर्मल तिवारी, चिरागचे मामा हेमंत पुरोहित यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com