जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात हरविलेल्या बालकांसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान-9 या मोहीमेत 1 ते 31 डिसेंबर दरम्यान 54 बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी 51 बालकांना त्यांच्या पालकांचा शोध घेऊन ताब्यात देण्यात आले.

1 ते 31 डिसेंबर दरम्यान मोहिम

सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गृह मंत्रालय व विशेष पोलीस महानिरीक्षक महिला बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या आदेशाने हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान -9 ही मोहीम राबविण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या मोहीमेसाठी स्वतंत्र पथक तयार केले होते.

या पथकाची कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार दादाभाऊ पाटील, वसंत लिंगायत, भगवान पाटील, कमलाकर बागुल, अविनाश देवरे, किरण धनगर, गायत्री सोनवणे यांच्यासह केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्पाचे प्रदीप पाटील, विश्वजीत सपकाळे व योगानंद कोळी यांच्या पथकाने संपूर्ण जिल्ह्यात फिरुन हरविलेल्या बालकांचा शोध घेतला असता 54 बालके मिळून आली.

भीक मागत होती तर काही करीत रोजंदारीवर काम

बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल,ढाबे, कचरा गोळा करणारा समूह, धार्मिक स्थळे, मार्केट, सिग्नल याठिकाणी ही मुले भीक मागत होती तर काही ठिकाणी काम करीत होती. बालकांच्या शिक्षणाचे महत्व व भविष्यात भीक न मागू देणे यावर यंत्रणेने पालकांचे समुपदेश करुन 51 बालकांचा ताबा दिला. 3 बालकांना पालक नसल्याने त्यांना बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले.