विद्यापीठाचा ऑनलाईन दिक्षांत समारंभ

विद्यापीठाचा ऑनलाईन दिक्षांत समारंभ

3 मे रोजी होणार कार्यक्रम; 28 हजार 98 स्नातकांना मिळणार पदवी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ सोमवार 3 मे रोजी सकाळी 10.30 वाजता ऑनलाईन संपन्न होत असून, या समारंभाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

या दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहणार असून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत.

तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हया दोन्ही मान्यवरांचा दीक्षांत समारंभातील पदवीधरांशी होणारा संवाद हा निश्चित आगळा-वेगळा राहील असे प्रा.ई. वायुनंदन यांनी सांगितले.

28 हजार स्नातकांना मिळणार पदवी

या दीक्षांत समारंभासाठी 49 हजार 753 इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून त्यापैकी नोंदणी केलेल्या28 हजार 98 स्नातकांना या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान केली जाणार आहे.

यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 16 हजार 358 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 5 हजार 189 स्नातक, मानव्य विद्याशाखेचे 5 हजार 35 आणि आंतर विद्याशाखेचे 1 हजार 79 स्नातकांचा समावेश आहे.

त्यामध्ये 261 पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक. चे 437 विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली जाणार लिंक

दिक्षांत समारंभ ऑनलाइन असल्याने स्नातकांना ऑनलाईन उपस्थिती देता येणार आहे. त्याकरीता स्नातकांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावर रोजी सकाळी 9.30 वाजता उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

99 विद्यार्थी सुवर्णपदाचे मानकरी

दिक्षांत समारंभात यावर्षी 99 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदकाच्या मानकरी मुली असून 99 पैकी 66 सुवर्णपदक मुलींना तर 33 मुलांना मिळणार आहे. सुवर्णपदक प्राप्त होणार्‍या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com