नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी
USER

नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी

नशिराबादच्या विकासासाठी कटीबध्द : ना. पाटील

मुंबई / जळगाव - प्रतिनिधी :

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून आज याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

तर, जळगावच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिना अखेर पर्यंत नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द हा खरा ठरवला असून येथे आता अन्य नगरपालिकांसोबत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. येथे आजवर १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत कार्यरत होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येथे नगरपरिषदेच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक आली. लवकरच नगरपरिषद होणार असल्याने गावकर्‍यांनी अभूतपुर्व एकी दाखवत या निवडणुकीत भागच घेतला नाही. येथे फक्त एक सदस्य अविरोध निवडून आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात नशिराबाद नगरपरिषदेसाठीची तयारी जोराने सुरू होती. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद याच्यातर्फे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

नगरपरिषदेसाठी स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात एकानेच घेतलेल्या आक्षेपालाही प्रशासनाने समाधानकारक निराकरण केले. यातच काही दिवसांपूर्वी पाकलमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जून महिन्याच्या अखेरीस नगरपरिषद होणार असल्याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने आज नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार निवडणूक होईपर्यंत जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांच्या भगीरथ प्रयत्नाला यश

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी नशिराबदकरांना नगरपरिषदेचा दिलेला शब्द पाळला आहे. या शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आगामी निवडणुकीत शहरवासी आम्हाला कौल देतील हा पूर्ण विश्‍वास आहे.

आजचा दिवस हा नशिराबादच्या इतिहासातील सोन्याचा दिवस असून आम्ही याचे मन:पूर्वक स्वागत करत आहोत. नगरपरिषद झाल्यामुळे नगरविकास खात्याच्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या सर्व योजना या शहरासाठी मंजूर करण्यात येणार आहेत.

यामुळे नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले. नशिराबाद नगरपालिकेच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितादादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहेत.

नशिराबादेत शिवसैनिकांचा जल्लोष

दरम्यान, नगरपरिषदेच्या नोटिफिकेशनचे वृत्त येताच नशिराबादकरांनी याचे जल्लोषात स्वागत केले आहे. शिवसैनिकांनी जोरदार आतषबाजी करून याचे स्वागत केले. शहराच्या विकासाला यामुळे गती मिळणार असल्याचा आशावाद नागरिकांनी व्यक्त करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

जळगाव बनला सर्वाधीक नगरपालिकांचा जिल्हा !

महाराष्ट्र शासनाने आज नशिराबाद नगरपरिषद स्थापनेची उदघोषणा जाहीर केली. मनपा सह नशिराबाद ही जळगाव जिल्ह्यातील २० वी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ठरली असून महाराष्ट्र सर्वात जास्त नागरी स्वराज्य संस्था असलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची नोंद झाली आहे.

नशिराबाद शहराला ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतुन वगळून नगर विकास विभागाच्या अखत्यारीत समाविष्ट केल्याने यापुढे नगर विकास विभागाच्या सर्व योजनांचा लाभ नशिराबाद शहराला मिळणार आहे. याशिवाय जिल्हा नियोजन अंतर्गत देखील भरीव निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नशिराबाद शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद नगरपरिषद होण्यासाठी नगर विकास मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com