ट्रॅफिक गार्डनच्या पाच एकर जागेवर साकारणार नवीन जिल्हा न्यायालय

नगरविकास विभागाकडून अध्यादेश जारी : अनेक वर्षापासूनचा प्रश्न लागला मार्गी
ट्रॅफिक गार्डनच्या पाच एकर जागेवर साकारणार नवीन जिल्हा न्यायालय
USER

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा न्यायालयाला नवीन जागेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून बारगळला होता. यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर जिल्हा न्यायालयाला जळगाव शहरातील शाहू नगर येथील ट्रॅफिक गार्डनची पाच एकर जागा मिळाली आहे. सदरची जागा जिल्हा न्यायालयाला मंजुरीबाबतचे अध्यादेश आज बुधवारी शासनाच्या नगरविकास विभागाने काढले आहेत.

गेल्या तीन वर्षापासून नवीन जागेसाठी पाठपुरावा सुरु होता. आज ट्रॉफिक गार्डनच्या जागेला मंजुरी मिळाली आहे. ही जागा शहराच्या अंत्यत्य मध्यवर्ती ठिकाण असून त्या शेजारी वकील बांधवांचे चेंबर असल्याने सोयीचे ठिकाण आहे. मोठी जागा असल्याने सद्यस्थितीतील जागेत उद्भवणार्‍या सर्व समस्या सुटणार आहे.

अ‍ॅड. केतन ढाके. जिल्हा सरकारी वकील

जिल्हा न्यायालयाला आहे त्या जागेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने जळगाव शहरातील ट्राफिक गार्डनची जागा मिळावी यासाठी सातत्याने यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्षअ‍ॅड. संजय राणे, सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्यासह तत्कालीन न्यायमूर्ती गोविंद सानप यांचाही शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू होता.

तसेच महापालिकेच्या बाजूने माजी महापौर नितीन लढ्ढा पाठपुरावा करत होते. 8 जून रोजी मुंबई येथील मलबार हिल येथील निवासस्थानी नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके तसेच जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड संजय राणे यांनी भेट घेतली होती.

जिल्हा न्यायालय सद्यस्थितीत ज्या जागेत आहे त्याठिकाणी पुरेशा जागेअभावी वकील बांधवांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री शिंदे यांना जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सांगितले. तसेच नवीन जागा म्हणुन ट्राफिक गार्डनचा प्रस्ताव आपल्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यास लवकर मंजुरी द्यावी असे साकडे ज्येष्ठ नेते खडसे यांच्यासह जिल्हा सरकारी वकील यांनी मंत्री शिंदे यांना घातले होते.

यावेळी मंत्री एकनाथराव शिंदे यांनी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना बोलून सदर प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी ठेवा असे आदेश देत जिल्हा न्यायालयाला लवकरच नवीन जागेसाठी मंजुरी मिळेल असे आश्वासन दिले होते. दरम्यान शाहू नगर येथील ट्रॅाफिक गार्डनची पाच एकर जागा जिल्हा न्यायालयासाठी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत आज बुधवारी नगरसविकास विभागाचे कार्यासन अधिकारी प्रणव कर्पे यांच्या स्वाक्षरीचे अध्यादेश जारी केले आहेत. जिल्हा न्यायालयात नवीन जागा मिळवून देण्यासाठी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही मोलाचे लाभले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com