नशिराबाद येथील आरोग्यकेंद्र
नशिराबाद येथील आरोग्यकेंद्र
जळगाव

७२ रुग्णांची करोनावर मात

करोनावर अंकुश लावण्यात नशिराबादकरांना मिळतेय यश

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड हॉस्पिटलमध्ये जावून चाचणी करून घेतली तर वेळेवर इलाज होईल यासाठी नागरीकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

डॉ.संजय चव्हाण

जळगाव - Jalgaon - नशिराबाद - Nashirabad - वार्ताहर :

नशिराबाद गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेतली. मात्र अखेर कोरोनाने शिरकाव केलाच. जिल्ह्यात कोरोनाने अत्यंत वेगाने आपले हात-पाय पसरविले याची कल्पना सर्वांना आहेच. त्यातच जळगाव शहरात तर कहरच झाला आणि या शहरापासून नशिराबाद काही अंतरावरच असल्याने व सर्वांचा संपर्क शहराशी येत असल्याने याठिकाणी सुध्दा बाधीत रूग्ण आढळू लागले. मात्र आरोग्य विभागासह ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, नागरीकांनी वेळीच खबरदारी घेत आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणल्याने कोरोनावर अंकुश लावण्यात यश मिळत आहे. समाधानाची बाब म्हणजे गावातील 72 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार दि.25 जुलै पर्यंत 89 जणांना कोरोनाची बाधा झाली. दुर्दैवाने 8 रूग्ण दगावले तर 72 रूग्णांनी कोरोनाला हरविले. सद्यस्थितीत 7 रूग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत तर दोन रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यात 72 रूग्ण कोरोनामुक्त होणे ही गावासाठी दिलासादायक बाब आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणार्‍या ग्रामस्तरावरील ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचे चांगले कार्य सुरू आहे. सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे व सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आणि करत आहेत. यात नागरीकांनीही चांगले सहकार्य केले, जनता कर्फ्युलाही प्रतिसाद दिला. गावात सर्व समाज बांधव एकत्र राहत असल्याने सर्वांनी आपापले धार्मिक सण, उत्सवही साध्या पध्दतीने साजरे करत काळजी घेतली. शासन, प्रशासन सर्व प्रयत्न करत आहे. डॉक्टरही त्यांची सेवा देत आहेत. पण कोरोनाला हरवायचे असेल तर लोकसहभाग महत्वाचा आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री.पाटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन अग्निहोत्री, डॉ.पराग पवार, आरोग्य सहाय्यक पी.डी.कोळी, आरोग्य सेवक दीपक तायडे, आबा पाटील व इतर सहकारी तसेच आशा स्वयंसेविक नागरीकांची थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सीजन लेव्हल, आरोग्य सर्व्हे आदींकडे लक्ष देवून आहेतच. पोलिस विभागाचे सपोनी प्रविण साळुंखे व त्यांचे सहकारीही रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com