जळगाव । Jalgaon

जळगाव शहरातील शाहू नगरातील जळकी मील परिसरात शेख अल्तमस शेख शकील उर्फ सत्या (22, रा.इंदिरा नगर) याचा शाहू नगरातील जळके मीलच्या परिसरात खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता घडली.

जुन्या वादातून ही घटना घडली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड करुन चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान रात्री 12.30 वाजता मुख्य संशयिताचा देखील पोलिसांना सुगावा लागला. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरीदेखील दाखल झाले. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. तरीही त्याचा पाठलाग करत सोमवारी रात्री 1.10 मिनीटांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

शेख अल्तमस शेख शकील उर्फ सत्या याचा शाहू नगरातील जळके मीलच्या परिसरात खून झाल्याची माहिती वॉचमनने त्याचा चुलत भाऊ एहतेश्याम शेख याला दिली. त्याने त्याला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. डोक्यात फरशी मारल्यामुळे त्याचा जीव गेल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर चप्पल आढळून आली.

सत्या याने आठ दिवसापूर्वी शाहू नगरात मुजाहील शेख इब्राहीम या टपरीचालकावर शस्त्राने हल्ला करुन दुकानातून पैसे काढून घेतले होते. यात सत्या याला अटक झाली होती. या गुन्ह्यात तो जामीनावर होता. दरम्यान, टपरी चालकाला संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. जुन्या वादातून शाहूनगरातील रहिवासी असलेल्या एकाने हा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मयताला गांजाचे व्यसन असल्याने नशेतून हा खून झाल्याचेही सांगण्यात येत आहे .शेवटचे वृत्त हाती आले तोवर याप्रकरणी चार जणांना संशयावरून ताब्यात घेतले असून पोलिस अधीक्षक व इतर अधिकारी शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी पाहणी करून ज्या ठिकाणी हा खून झाला त्या बँकांच्या कर्मचार्यांनाही विचारपूस केली. अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी तरूणाचे खून झाल्याचे सांगत नेमके खुनाचे कारण अद्यापही स्पष्ट नसल्याचे देशदूतशी बोलतांना सांगितले. दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी काही जणांशी वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली होती. त्यानुसार वाद घालणार्या तसेच मयताशी संबंधित अशा सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी बोलताना दिली. घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा संशयितांच्या शोधार्थ कामाला लागलेली आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांची स्वतः पोलिस अधीक्षकांसह अधिकारी विचारपूस करीत असल्याचेही वृत्त आहे.

शेजार्यानेच केला घात

ज्याठिकाणी खून झाला त्याठिकाणी टेन्ट हाऊस आहे. याठिकाणी काम करणारे सर्व मुले उत्तरप्रदेश येथील आहेत. खून झाल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पन्नास ते शंभर फोटो दाखविले. यातून संशयिताची ओळख पटली. त्यानुसार त्याला अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान खून झाल्यानंतर काही वेळासाठी शेख अझरुद्दीन उर्फ भूत फलित हा जिल्हा रुग्णालयातही आल्याची माहिती मिळाली आहे. भूत फलित हा संशयित मयताच्या शेजारीच राहत असल्याचेही समजते.