जळगाव- Jalgaon

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मास्क न वापरणार्यांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरु आहे. सोमवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास उपायुक्त संतोष वाहुळे जोशी पेठ परिसरातील बागवान मोहल्ल्यात पोहचले. त्या ठिकाणी त्यांनी काही विक्रेत्यांना मास्क लावण्याची सूचना केली. तसेच रस्त्यांवर विक्री करण्यास मज्जाव केल्यामुळे दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत वाहनाच्या काचा फोडल्या गेल्या.

दरम्यान, उपायुक्त वाहुळे बालंबाल बचावले असून, त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे गेल्या काही दिवसांपासून मास्क न वापरणार्यांवर कारवाई करीत आहे. तसेच दररोज, ध्वनी क्षेपकाव्दारे बाजारपेठेमध्ये गर्दी न करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील करत असतात. जे कोणी नियमांचे उल्लंघन करत असतील त्यांच्यावर कारवाईदेखील केली जाते. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांनी फुले मार्केट, सुभाष चौकात पाहणी केली. त्यानंतर बागवान मोहल्ल्यात ते पोहचले. या ठिकाणी काही विक्रेत्यांनी मास्क न लावता, व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन केले. मात्र येथील विक्रेत्यांनी ‘हमको, कोरोना नही होता’ असे म्हणत जमावाने उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक केली.

जमावाकडून दगडाचा मारा

बागवान मोहल्ल्यात मास्क लावण्यासंदर्भात उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सूचना केली. त्यानंतर ते आपल्या वाहनात बसून निघत असतांनाच जमावाने दगडांचा मारा केला. यात गाडीची मागील काच फुटला आहे. दरम्यान, या दगडफेकीत उपायुक्त वाहुळे बालंबाल बचावले.

अप्पर पोलीस अधीक्षकांची शहर पोलिसात धाव

दगड फेकीची घटना घडल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे हे थेट शहर पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे देखील शहर पोलीस ठाण्यात पोहचले आणि उपायुक्त वाहुळेंकडून घटनेबाबतची माहिती जाणून घेतली.

यापुर्वीही केली होती दगडफेक

रस्त्यांवर व्यवसाय करीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे कारवाई केली जात आहे. बागवान मोहल्ल्यात आज ज्या प्रमाणे दगडफेक केली गेली अशीच दगडफेक एक ते दिड वर्षापुर्वी अतिक्रमण विभागाच्या पथकावर करण्यात आली होती.

दुपारनंतर बाजारपेठ बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, ५ ते ३० एप्रिल पर्यंत ‘ब्रेक द चेन’ साठी निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे दुपारनंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्याची सूचना दिली.