सूरज झंवरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

सूरज झंवरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयित सुरज झंवर याने मुंबई येथील उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

त्या अर्जावर आज सुनावणी होवून हायकोर्टाने सुरज याचा जामीनअर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या आज न्यायालयात कामकाज झाले.

जळगाव शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातील संशयितांना अटक केली आहे. यात सुरज झंवर याचाही समावेश असून तो सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत पुणे येथील येरवडा कारागृहात आहे.

सुरज झंवरने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथील उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. संशयित सुजर झंवर तर्फे युक्तीवाद करतांना वकीलांनी अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळू शकतो तर आम्हाला का नाही, आमच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीत, असे म्हणत जामीन मिळावा, अशी मागणी केली.

त्यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तीवाद केला. तसेच सुरज झंवर संदर्भातील आर्थिक गुन्हे शाखेने संकलित केलेले पुरावे हायकोर्टासमोर सादर केले. सुनावणी अंती न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सुरज झंवर याचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com