मेव्हण्याला वाचविताना शालकाचाही मृत्यू

मयत कांचननगरातील रहिवासी : कुटुंबीयांचा आक्रोश
मेव्हण्याला वाचविताना शालकाचाही मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

एमआयडीसी समृध्दी केमिकल्स या खतनिर्मितीच्या कंपनीत ड्रेनेजच्या टाकीत पडून तीन जणांचा एकापाठोपाठ पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज शनिवारी घडली.

मृतामध्ये दिलीप अर्जून सोनार वय 54 व मयूर विजय सोनार वय 35 दोघे रा. कांचननगर हे एकमेकांचे सख्खे शालक आणि मेव्हणे आहे. ड्रेनेजच्या टाकीने दोघा शालक मेव्हण्याचा जीव घेतल्याने जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. दरम्यान कांचनगरातील दोघेही बुडून मृत्यू झाल्याबाबत कंपनीकडून कळविण्यात आले नाही, मोबाईलमध्ये बातमी बघितल्यावर प्रकार कळाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला.

मूळ पाल येथील दिलीप अर्जून सोनार हे रोजगारानिमित्ताने जळगाव शहरातील कांचननगरात स्थायीक झाले आहेत. याच ठिकाणी त्यांचा शालक मयूर विजय सोनार हा सुध्दा कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.

दिलीप सोनार हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून समृध्दी केमिकल्स या कंपनीत कामाला होते. आज सकाळी कंपनीत टाकीची साफसफाई करण्यासाठी दिलीप टाकीत उतरले. यावेळी शिडीवर उभे राहून घाण असलेली बादली भरुन ते वर उभा शालक मयुर याला देत होते. यादरम्यान त्यांचा पाय घसरला. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या मयुरही टाकीत पडला अवघ्या पाच ते दहा मिनिटात दोघांचा जीव गेला. दिलीप पाटील यांच्या पश्चात पत्नी राणी, तीन मुली, हर्षदा, गायत्री व धनश्री तर मुलगा स्वामी असा परिवार आहे. तर मयुर हा दोन वर्षांपासून या कंपनीत कामाला होता.

मयुर याच्या पश्चात आई दुर्गाबाई पत्नी, आरती, मुलगा भावेश व मुलगी कणा असा परिवार आहे.

कामगारांचे पगारासाठी आलेल्या ठेकेदारावरही काळाची झडप

या रविंद्र उर्फ गोटू झगडू कोळी हे ठेकेदार असून कंपनीत कामासाठी मुले पुरविण्याचे काम करत होते. यावल तालुक्यातील चिंचोली येथील ते रहिवासी आहेत. एमआयडीसीतील समृध्दी कंपनीतही कोळी यांनी कामगार म्हणून मुले पुरविलेली आहेत. या कामगारांचा पगार करण्यासाठी कोळी हे आज समृध्दी केमिकल्स या कंपनीत आले होते. याचदरम्यान टाकीत पडलेल्या दोघांचा वाचविण्यास कोळी गेले. याठिकाणी त्यांच्यावर काळाने झडप घातली. वाचविण्यासाठी गेलेल्या दोघांबरोबरच कोळी यांचाही टाकीत पडल्यानंतर बुडून मृत्यू झाला. दरम्यान रविंद्र कोळी यांना लहानपणीच झगडू किसन कोळी यांनी दत्तक घेतले होते. कोळी यांच्या पश्चात वडील झगडू कोळी, आई सिताबाई, पत्नी आरती, मुलगा साई, मुलगी परी असा परिवार आहे.

कंपनी मालक दोघे पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळावरील टाकी तसेच संपूर्ण कंपनीची पोलिसांनी पाहणी केली. कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. संभाव्य घटना लक्षात घेता कंपनी मालक दोघा भावांना पोलिसांकडून तातडीने ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान कंपनीत संबंधित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प असतांनाही त्यावर प्रक्रिया न करता ते संबंधित टाकीत जमा होते. त्यानुसार संपूर्ण चौकशी करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत.

कामगारांनाही अश्रू अनावर

टाकीत पडल्यानंतर तिघांना कंपनी मालकाचा मुलगा यांच्यासह कामगार देवीदास सपकाळे, गौरव धनगर, करन धनगर, शरद पाटील व संतोष पाटील यांनी तातडीने टाकीतून वर काढून जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र याठिकाणी तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान आपल्याला कंपनीत कामाला लावणार्‍या ठेकेदार रविंद्र कोळी यांचाही मृत्यू झाल्याचेही कळाल्यावर कंपनी कामगार तरुणांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहाजवळ आक्रोश केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com