जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी ;

जिल्हयात आगामी काही महिन्यातच ऑगस्ट 2020अखेर मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे.

या ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण देखिल डिसेंबरच्या तिसर्या सप्ताहात जाहिर होण्याची शक्यता असतांनाच यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतींच्या 12 सदस्यांवर ग्रामपंचायत करभरणा वेळेवर न केल्यामुळे सदस्यपदावर रहाण्यासाठी अपात्र असल्याची कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी पारीत केले आहेत.

यासोबतच आगामी सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास देखिल हे बारा सदस्य अपात्र ठरविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी अॅड.हरूल देवरे यांनी दिली.

यावल ग्रामपंचायतींतर्गत सन 2015-2020 या कालावधीत झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत 13 सदस्य निवडून आले होते. या सदस्यांनी सन 2019-20 अंतर्गत पाणीपुरवठा, मालमत्ता कर, घरपट्टी पाणीपट्टी आदींचा करभरणा केलेला नाही.

या करथकबाकीसंदर्भात यावल गटविकास अधिकारी यांचेसह ग्रामविकास अधिकारी यांनी डोंगर कठोरा ग्रामपंचायतीस अचानक दिली होती.

या भेटीदरम्यान दप्तर तपासणी केली असता घरपट्टीसह इतर करआकारणी भरणा ग्रामपंचायत सदस्यांनी विहित वेळेवर केलेला नसल्याचे आढळून आले होते.

याची तक्रार जि.प.सीइओ.डॉ.बी.एन.पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याकडे दि.25 सप्टेंबर 2020रोजी केली होती.

या तक्ररीची सुनावणी दि.3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सखोल सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती ग्रा.पं. कर थकबाकी प्रकरणी 12 सदस्य अपात्रतेसह आगामी सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अनर्हतेचा निर्देश गुरूवार दि.10डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी पारीत केले आहेत.

ग्रामपंचायतीत सदस्यपदी निवडून आलेल्या सदस्यांनी ग्रामपंचायत अधिनियमानुसार करभरणा वेळेवर करणे आवश्यक आहे.

या ग्रापंचायतीत 13 ग्रामपंचायत सदस्यांपैकी केवळ विद्यमान सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनीच ग्रामपंचायत कर भरणा केलेला आहे.

तर उपसरपंच नितीन भागवत भिरूड(96 दिवस), रत्नदिप मुरलीधर सोनवणे(162दिवस) युदूनाथ पे्रमचंद पाटील,(177 दिवस ) प्रीती विनोद राणे या सदस्यांनी उशीराने कर भरणा केला आहे.

तर उर्वरित निसार सरदार तडवी, प्रितम प्रकाश राणे, चंद्रकांत जगन्नाथ भिरूड, शशिकला विजय भिरूड, हलिमा रफिक तडवी, रेखा लुकमान तडवी, हसिना सुपडू तडवी, अनिता मनोहर बाउस्कर आदी आठ सदस्यांनी नोटीस मिळून देखिल विहीत मुदतीत 90 दिवसांच्या आत ग्रामपंचायत करभरणा केलेला नाही.

लोकप्रतिनिधींनी कर रकमा भरणा उशीरा करणे वा कर भरण्यास टाळाटाळ करणे या कारणावरून ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14(ह)नुसार गुरूवार दि.10 डिसेंबर 2020 पासून पुढील सहावर्षे पर्यंंत या बारा ग्रामपंचायत सदस्यानीं अपात्र घोषित करण्यात आले आहे. ग्रामसेवक यांनी या अपात्र ग्रा.पं.सदस्यांकडून थकीत कर रकमेवर 5 टक्के नोटीस फि, 5 टक्के दंड व एकूण रकमेवर पुन्हा 5 टक्के व्याजासह करभरणा वसुली करून तशी या अपात्र सदस्यांना पावती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राउत यांनी दिले आहेत.

तसेच करभरणा न केल्यामुळे सहा वर्षांसाठी सदस्यांना अपात्रतेची कारवाई हि जिल्हयात प्रथमच करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय विधी अधिकारी अॅड. हरूल देवरे यांनी दिली.