सात जन्माच्या रेशीमगाठी, सात दिवसातच तुटतात तेव्हा...

सात जन्माच्या रेशीमगाठी, सात दिवसातच तुटतात तेव्हा...

विवाहानंतर अवघ्या काही दिवसात पोलिसांकडे गार्‍हाणे मांडण्याची वेळ

किशोर पाटील - Jalgaon - जळगाव :

सात जन्मापर्यंत आपण दोघे एकमेकांच्या सोबत राहू असे देवाला साक्षी मानत लग्नांच्या बंधनात अडकतात. मात्र सात जन्माच्या या रेशीमगाठी अवघ्या सात दिवसात तुटून दाम्पत्याचे गार्‍हाणे पोलिसांसमोर पोहचत आहेत.

महिलांमध्ये जागृती आली, त्यामुळे अधिकाराच्या भावनेसोबत अहंकार येतो, अन् कर्तव्याचा विसर पडतो. गरजा वाढल्या, त्याबरोबरच प्रचंड अपेक्षाही वाढल्या. आताच्या पिढीत सहनशक्ती कमी झाल्याने वाद विकोपाला जाताहेत. लग्नापूर्वी एकमेकांचे स्वभाव, अपेक्षो समजून घ्यावेत. ज्यामुळे वितुष्ट दूर होवून होणार्‍या दुर्घटनाही टाळता येतील.

- डॉ. निरज देव, मानसोपचार तज्ज्ञ

जिल्हा महिला दक्षता समितीकडे दर महिन्याला तक्रारींचा पाऊस पडतोय. मोबाईल अनेकांच्या संसारात विघ्नसंतोषी ठरतोय तर मानपान, हुंडा कमी अशा कारणांवरुन घटस्फोट अन् गुन्हा दाखल, कोर्ट कचेरीपर्यंत प्रकरणे पोहचून लग्नानंतर अवघ्या काही दिवसात संसार मोडत असल्याचे सुन्न करणारे चित्र दिसून येत आहे. यास पुरूषांप्रमाणेच महिलाही तेवढ्याच जबाबदार असल्याचेही काही घटनांवरुन समोर आले आहे.

या कारणांमुळे संसारात विघ्न

मोबाईल वापरणे, चारित्र्यावर संशय, एकत्र कुटुंबात न राहणे याबरोबरच लग्नात मानपान न देणे, हुंडा, विविध कारणांसाठी पैशांची मागणी, नोकरी असल्याचे खोटे सांगून लग्न, या कारणांवरुन दोघांच्या संसारात विघ्न पडत आहेत. विशेष म्हणजे यात सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहेत.

दोघेही सुशिक्षित असतांनाही, एकमेकांना समजून न घेता किरकोळ कारणांवरुन वाद, भांडण होवून घटस्फोट अन् पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण पोहचत आहेत. दोघेही नोकरी करणारे असल्याने एकमेकांना वेळ न देणे त्यामुळे संवादाच्या अभावामुळे दोघांमध्ये ताटातूट होतेय. लग्नानंतर 2 दिवस, 15 दिवसातच तक्रारी येत असल्याचेही महिला दक्षता समितीच्या अभिलाषा चर्‍हाटे यांनी बोलतांना सांगितले.

618 तक्रारींमधून केवळ 91 प्रकरणांमध्ये तडजोड

पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीत पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मनिषा पाटील, पोलीस नाईक अभिलाषा चर्‍हाटे, सविता परदेशी, संगीता पवार, योगीता पाचपांडे, वैशाली पाटील ह्या कार्यरत आहेत.

केवळ तक्रारीचा निपटाराच नाही तर दाम्पत्यांचे समुपदेश करुन दोघांमध्ये तडजोडीमध्येही कर्मचार्‍यांची महत्वाची भूमिका पार पाडतात. महिला दक्षता समितीकडे जानेवारी ते मे 2021 या पाच महिन्याच्या काळात तब्बल 618 तक्रारी दाखल झाल्या.

यात 91 प्रकरणांमध्ये तडजोड होवून महिला सासरी नांदावयास गेली आहे. तर 219 प्रकरणांमध्ये तडजोड न झाल्याने गुन्हे दाखल झाले. 95 प्रकरण न्यायालयाकडे तर तक्रारीनंतर पती व पत्नी दोघांपैकी कुणीही हजर न राहिल्याने 168 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

जीव देण्यासह जीव घेण्यापर्यंत घटना

छळाला कंटाळून कौटुंबिक वाद विकोपाला जावून महिला, पुरूष जीवन संपवित आहेत. तर काही घटनांमध्ये पत्नीचा जीव घेण्यापर्यंतचेही प्रकार घडतात. यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणे, महत्वाचे असून त्यावरच सुखी संसार अवलंबून आहे. दोघांच्या भांडणात मात्र मुले उघड्यावर पडत असल्याचेही अनेक उदाहरणे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com