दिव्यांगत्वावर मात; ‘मानसी’ नृत्यकलेत निपुण

दिव्यांगत्वावर मात; ‘मानसी’ नृत्यकलेत निपुण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ना मुँह छुपा के जियो, और ना सर झुका के जियो, गमों का दौर भी आये तो, मुस्कुराके जियो हा सकारात्मक विचार कृतिशील जगणारी एकवीस वर्षाची जळगावच्या अयोध्या नगरातील कुमारी मानसी हेमंत पाटील एकाच डाव्या पायाने नृत्य कलेत निपुण असलेली दिव्यांग नृत्यांगना !

अदम्य जिद्द, ध्येयवाद, सकारात्मक वृत्ती, खंबीरपणा ही मानसीच्या जगण्याची चतु:सूत्री सबलांनाही दीपस्तंभाप्रमाणे अक्षय प्रेरणा देते.

मानसी जन्मजात अपंग नव्हती ...इयत्ता दहावीत काशिबाई ऊखा कोल्हे विद्यालयात शिकत असताना दिनांक 16 नोव्हेंबर 2014 रोजी क्लासला जाताना खेडी गावालगतच्या महामार्गावर दुचाकीचा धक्का लागून ती हायवेवर पडताच भरधाव गॅसचा टँकर उजव्या पायावरून गेला . दोन अवघड शस्त्रक्रिया झाल्या परंतु दुर्दैवाने अखेर मांडीपासून पाय कापावा लागला .

तारुण्यात पदार्पण केलेल्या मानसीच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली . अपंगत्वाचे लेवून वसने,कशी पहावी सुंदर स्वप्ने ? अपंगत्वाचा राक्षस करतो, आयुष्याची उजाड राने क्षणोक्षणी व पदोपदी येणार्या असाह्य शारीरिक व्यंगाच्या असहाय्यतेतून अपंग न्यूनगंडाने एकाकी व निराशावादी होतात परंतु अवघ्या चार महिन्यांनी मानसीने परीक्षा देऊन 76 % गुणांनी घवघवीत यश मिळवून अपंगत्वावर मात केली .इयत्ता 11वी ते 12 वी पर्यंत डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात शिक्षण घेतले.

घरची परिस्थिती हलाखीची ...वडील फक्त चौथी शिकलेले आणि आईचे शिक्षण दहावीपर्यंत . मोल मजुरीवर घर चालायचे ... अशावेळी नातेवाईकांनी मदत केल्यामुळेच त्यावेळी उपचार शक्य झाला .

एकट्या लाडक्या बहिणीला अपंगत्व आल्याने मोठाभाऊ पुष्कर अकाली प्रौढ झाला. जिद्दीने कमवा आणि शिका या पद्धतीने पोटाला चिमटा देऊन त्याने शिक्षण घेतले .

आता तो पुण्याला नोकरीला आहे. जयश्री आईची माया, वात्सल्य हा माझा औषधोपचार व पुष्कर दादा आणि वडिलांनी दिलेले प्रोत्साहन हाच माझा मानसोपचार आहे, असे मानसी अभिमानाने सांगते.

अल्पशिक्षित मातापित्यांनी मानसीच्या इच्छा आकांक्षांचे नंदनवन फुलवून मनोबल वाढविले. मानसीच्या नृत्याच्या आवडीच्या सुप्त इच्छेने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली .

दुर्दम्य इच्छाशक्तीने दोन वर्षात मानसीने एका पायावर तोल सांभाळण्याचा दररोज एक तास व्यायाम करीत स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवलं .दिव्यांग नृत्यांगना सुधा चंद्रन व शुभ्रीत कौर यांच्या प्रेरणेने व देनोवो डान्स क्लासचे संचालक योगेश मर्दाने या गुरुंच्या साहाय्याने नृत्याचे धडे घेतले. पुरस्कार पटकावून नृत्यांगना म्हणून ओळख निर्माण केली.

द वार ऑफ ग्लाडीटर सिझन 4 या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक, धनाजी नाना कॉलेजच्या वार्षिक समारोहात द्वितीय पारितोषिक , डान्सिंग स्टार्स तसेच गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या स्पर्धेतही सलग दोन वर्षे आणि वार्षिक देनोवो क्लासच्या स्पर्धेतही सलग दोन वर्षे सन 2019 20 मध्ये बक्षिसे पटकावली .

बॉलीवूड डान्स कॉम्पिटिशन तसेच रिअलीटी शोमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविण्यासाठी मानसी शर्थीचा नृत्यसराव करीत आहे. सलाम बॉम्बेमधील तुही रे ...,जो जो भेजी थी दुवा ,जादू की झप्पी, घूमर ,या गाण्यांवर मानसीचा पदन्यास आणि नृत्याविष्कार आणि सानंद आत्मविश्वास पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

जन्मदात्या मातापित्यां प्रमाणेच अपंगत्व आल्यानंतर मला आर्थिक सहकार्य करणार्या संस्था आणि माझ्या कलागुणांना प्रोत्साहन देणार्‍या गुरुजनांना मी कदापि विसरू शकत नाही. महाविद्यालयीन काळात प्राचार्य राजेंद वाघुळदे यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले .

इयत्ता 11वी पासून पदवीधवर होईपर्यंत लढ्ढा क्लासेसने अकाउंटसाठी 5 वर्षा पर्यंत मला विनामूल्य अध्यापन केले. क्लासचे संचालक अमित सर, सुमित सर, प्रितेश सर, रवि सर यांचे शैक्षणिक कृपाशिर्वाद माझ्या आयुष्याची अक्षय शिदोरी आहे .

सन 2015 मध्ये महावीर सेवा सदनच्या डॉक्टर विकेनिव यांनी मला प्रथमतः जयपूर फूट दिला. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सन 2017 मध्ये तीन चाकी सायकल दिली.नारायण सेवा संस्थान कडून त्याच वर्षी आताचा जयपूर फूट मोफत दिलाय.

जळगावच्या रोटरी क्लबनेही सहकार्य केले .मानसीचे मनोबल चाचपडून बघण्यासाठी मी एक मार्मिक प्रश्न तिला शेवटी विचारला, मानसी, अपघाताने नीतीने तुझा एक पाय हिरावून घेतल्या नंतर तुला याक्षणी काय वाटते ? मानसी हसत उत्तरली, सबल फक्त कामासाठी एका पायावर उभे राहण्याची शेखी मिरवतात परंतु नियतिने मला आमरण एका पायावर उभे राहण्याचे अक्षय बळ दिले आहे.

तत्वज्ञान्यालाही लाजवेल असे दिलेले उत्तर ऐकून मानसी भविष्यात नृत्यकलेत करियर करण्याचीआपली ध्येयपूर्ती 100% निर्भयपणे निश्चित करेल याबद्दल खात्री पटली. तिच्याबद्दलचा अभिमान आणि पूर्वीचा आदर या उत्तराने शतपटीने वाढला, अशी भावना तरसोद जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे उपशिक्षक विजय सुपडू लुल्हे यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com