जळगाव : बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक
जळगाव

जळगाव : बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर काल दि.१० रोजी एका 10 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंद्रप्रस्थनगरमधून अटक केली आहे. सौरभ वासुदेव खरडीकर (वय 25, रा.राधाकृष्ण नगर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित बालिका आपल्या आत्यासोबत गोलाणी मार्केटसह इतर भागातून भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. शुक्रवारी सकाळी 11 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाने गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिराच्या मागे उभे असलेल्या पीडित बालिकेला तुला खाऊ देतो, असे सांगून गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर घेऊन आला.

त्यानंतर एका मुतारीत नेत त्या तरुणाने बालिकेवर अत्याचार केला आणि तेथून पसार झाला. पीडित बालिका रडत रडत गोलाणी मार्केटच्या खाली आपल्या आत्याकडे आली आणि सर्व आपबिती कथन केली.

त्यानंतर आत्याने पीडित बालिकेला सोबत घेवून शहर पोलीस स्थानक गाठले होते. दरम्यान, पोलिसांनी गोलाणी मार्केटच्या दुसर्‍या मजल्यावरील बालाजी प्लेसमेंट बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आरोपी त्यात पीडित बालिकेसोबत सीसीटीव्हीत कैद झाला होता.

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे सौरभ वासुदेव खरडीकर (वय 25, रा.राधाकृष्ण नगर) अशी आरोपीची ओळख पटली आहे. त्यानुसार आरोपीला शनिवारी इंद्रप्रस्थनगरमध्ये फिरत असतांना अटक करण्यात आली.

दरम्यान, आरोपीने आपल्या कृत्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी दिली आहे. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घटनास्थळी आणले होते. त्याने केलेल्या कृत्याची कबुली देत घटनास्थळही दाखविले. तसेच ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com