लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे धान्य वाटप

स्व.शाहीर दिलीप जोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणदिनी उपक्रम
लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे धान्य वाटप

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे शाहीर दिलीप जोशी यांच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या औचित्याने मंगळवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, अ‍ॅड. विजय पाटील, डॉ. गोपी सोरडे संस्थेचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. या श्रुंखले अंतर्गत स्व. शाहीर दिलीप जोशी यांच्या स्मृतिदिनी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरंभी शाहीर संग्राम व संदीप जोशी यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.

कोविडमध्ये घरच्या कर्त्या पुरुषाचे निधन झाले अशा नितीन तांदळे व हिमांशू बोरसे यांच्या परिवाराला देखील संस्थेतर्फे मदत करण्यात आली.

लाभार्थी विलास पवार, प्रवीण मगरे, अरमान पटेल, सलीम शेख, हेमंत वाणी, भगवान पाटील, शरदभाऊ आणि लताबाई बारी, सरलाताई मगरे, बापूभाऊ पाटील, रामा पवार यांना प्रमुख पाहुणे हेमंत अलोने, अ‍ॅड. विजय पाटील, डॉ. गोपी सोरडे, संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोशी व पदाधिकारी संदीप जोशी, अर्चना जोशी, किशोर कुळकर्णी, योगेश सुतार, प्रेषित पुराणीक आदिंच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे अ‍ॅड. विजय पाटील यांनी स्व. दिलीप जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. गोपी सोरडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन किशोर कुळकर्णी व आभार संदीप जोशी यांनी मानले.

जळगाव शहर मनोरुग्णमुक्तचा संकल्प

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देऊन, रस्त्याच्या कडेला मनोरुग्ण आढळतात ते पूर्णतः दुर्लक्षीत असतात. अशांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम आपण करत आहोत. एका मनोरुग्ण महिलेचे पुनर्वसन करण्यात आलेले आहेच परंतु रस्त्याच्या कडेला असलेले मनोरुग्ण मुक्त शहर करण्याचा आपला संकल्प आहे. अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली. सर्वांनी त्यांच्या या संकल्पाचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

जोशी प्रतिष्ठानचे दातृत्व मोलाचे - हेमंत अलोने

कोविडच्या आव्हानात्मक परिस्थितीत पै-पैसा कामी येत नाही तर माणूसकीच कामाला आलेली आहे, अशा परिस्थितीत माणूसकी, दातृत्त्व मोलाचे ठरलेले आहे. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानने व जोशी परिवाराने गरजू लाभार्थिंना धान्य वाटप करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे असे प्रतिपादन दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com