जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

आशिया खंडातील प्रसिध्द असलेल्या ग.स.स.सोसायटीमध्ये शिक्षकांसह शासकीय कर्मार्यांची सभासद संख्या 40 हजार आहे.

या ग.स.सोसायटीच्या 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर आजी माजी संचालकांसह विविध गटाच्या प्रमुखांनी भेटी-गाठी आणि बैठकांवर जोर दिला आहे. लोकमान्य गटाकडूनही तालुकानिहाय उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू केली असून नवीन चेहर्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार असल्याची चर्चा लोकमान्य गटाच्या बैठकीत झाली.

ग.स.सोसायटीच्या लोकमान्यगटाची बैठक रविवारी स्वातंत्र चौकातील राज्य सरकारी कर्मचारी संघात घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील होते. यावेळी गटनेते मगन व्यंकट पाटील, माजी संचालक शरद पाटील, वाल्मीक पाटील, प्रतिभा सूर्वे, सुधाकर सूर्यवंशी, अमित मगन पाटील, साहेबराव पाटील, माजी संचालक गुणवंत पाटील आदी उपस्थित होते.

लोकमान्य गटाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव पवार यांनी ग.स.सोसायटीच्या लोकमान्य गटाचे नेतृत्व केले. त्यांचाच वसा पुढे नेण्याचे काम सुरु आहे. लोकमान्य गटाचे स्वतंत्र पॅनल ठेवून निवडणूक लढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ग.स.च्या 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर सहकार क्षेत्रात आगामी होणार्या निवडणुकीवर चर्चा होवू लागल्या आहे.

निवडणुक तोंडावर आली की, सभासदांचे व्याजदर कमी करण्याची जुनीच पध्दत आहे. निवडणुका झाल्या की, व्याजदर पुन्हा वाढविले जाते. आयाराम-गयाराम करणार्यांना धडा शिकविण्यासाठी सभासदांमध्ये प्रभावीपणे मुद्दे मांडणार असल्याचीही चर्चा या बैठकीत करण्यात आली. आता शिक्षक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून ग.स.सोसायटीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करुन उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका घेण्यावर भर दिला जाणार आहे.