लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली

व्यवहार पुर्ववत करण्यासाठी सरकारने सुवर्णमध्य काढणे अपेक्षित
लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या संक्रमणामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लॉकडाऊनचा पर्याय निवडून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यापारावर कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून संपुर्ण व्यवहार बंद असल्याने आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे.

आर्थिक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने अनलॉकबाबत सुवर्णमध्य काढावा अशी अपेक्षा अखिल भारतीय कॅट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी व्यक्त केली.

करोनाच्या महामारीने देशात थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकारने सुवर्णमध्य काढावा.

संजय शहा, जिल्हाध्यक्ष, कॅट असोसिएशन

एकीकडे कोरोनासारख्या संक्रमणाने जनता भयभीत झाली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये जीवन जगण्यासाठी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने लावलेल्या कडक निर्बंधामुळे सर्वसामान्य नारिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना सरकार काही प्रमाणात धान्य पुरवठा करीत असले तरी, जीवनात भरपूर अशा काही गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक सक्षम असणे गरजेचे असते. मात्र दीड महिन्यांपासून सर्वच व्यवसाय ठप्प असल्याने सर्वसामान्यांसह व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे आता व्यवहार सुरळीत होणे अपेक्षित आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मध्यम आणि मोठ्या व्यवसायिकांकडे जो काही पैसा होता. त्या पैशातून दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार अन्य खर्चांसह कर्जाचे व्याज भरुन व्यापारी आता थकला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी होत आहे.

त्यामुळे अनलॉकबाबत सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करुन व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी शिथिलता द्यावी. जेणेकरुन आर्थिक व्यवस्था सक्षम होण्यास हातभार लागेल आणि सर्वसामान्यांनाही आपल्या आर्थिक गरजा पुर्ण करता येईल. त्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी अपेक्षा संजय शहा यांनी व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com