विटनेर शिवारात विषबाधेने बिबट्याचा मृत्यू

विटनेर शिवारात विषबाधेने बिबट्याचा मृत्यू

वनविभागाकडून चौकशी सुरु : वन्यजीव संरक्षण संस्थेची दोषींवर कारवाई मागणी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील विटनेर गावाजवळ विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज वनविभागाच्या कर्मचार्‍यांसह डॉक्टरांनी वर्तविला आहे. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने केली आहे.

तर दुसरीकडे याप्रकरणाची चौकशी सुरु असून यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी दिली आहे.

बिबट्यानेच केली निलगायीची शिकार

जळगांव वनविभाग अंतर्गत येणार्‍या विटनेर वनक्षेत्रात कम्पार्टमेंट नं 439 मध्ये 5 जुलै रोजी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. मृत बिबट्यापासून दहा ते बारा मीटर अंतरावर एक निलगाय अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृत आढळून आली.

घटनेची माहिती मिळाल्यावर मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, सहाय्यक वनसंरक्षक चिमाजी कामडे, वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल विटनेर, वनरक्षक विटनेर, वनपाल जळगाव व रेंज स्टाफ यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला होता. पहुर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. जयलाल राठोड, नेरी पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत व्यवहारे व फत्तेपूर पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल ठाकूर यांच्या टीमने मृत बिबट्या व निलगायीचा पंचनामा केला होता. तसेच दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मृत बिबट व मृत निलगाय यांचे शव जाळून नष्ट करण्यात आले. निलगाय व बिबट्याचा व्हिसेरा उद्या गुरुवारी नाशिकला तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके समोर येणार वनपरीक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले. बिबट्याने निलगायीची शिकार केली. तिचे मांस खाल्ले आहे. निलगायीवर विषप्रयोग झालेला नसल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणी वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोषींवर कारवाई करा

या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, संबंधित बीटवरील वनविभागाच्या कर्मचार्‍याचे दैनंदिनी तपासून कर्तव्यात कसूर केलेला आढळून आल्यास वनरक्षक आणि कर्मचार्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण सुरेश देवरे, योगेश अरुण गालफाडे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अनिल अंजनकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com