तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी
जळगाव

तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग 40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

खेडी भोकर फुलाच्या बांधकामासंदर्भात आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.

या पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद करावी तसेच पुलाच्या बांधकामाच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देवून कामाला गती देण्याचे निर्देशही मंत्री जयंत पाटील व मंत्री श्री.चव्हाण यांनी दिले.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आ. लताताई सोनवणे, आ. अनिल पाटील,जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव , तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कांबळे, नदीजोड प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com